मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला आहे. यात पाच जण जखमी झाल्याची घटना नांदेडच्या गडगा-मुखेड रोडवर घडली. मराठवाड्यात पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटी देत आहेत. गेल्या तीन महिन्यात फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. काल रविवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान ही घटना घडली.
बालाजी शंकर पवार (वय २६ रा.मांजरी, ता. मुखेड), राजेश व्यंकटराव जाधव (वय ३६, रा. मुखेड), जमादार नामदेव सायबू दोसलवार, समीर भीसे (वय ३७) व अरविंद मोरे (वय ४०) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
गेल्या तीन महिन्यांतील फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. 8 जुलैला मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली होती. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर किरकोळ जखमी झाले होते. ताफ्यातील वाहनांनी धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाल्याची घटना गडगा-मुखेड रोडवरील बेळी फाटा येथे घडली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे लातूर, नांदेडच्या दौऱ्यावर होते. बेरळी येथे राजे छत्रपती अकॅडमी जवळ ताफ्यातील वाहनाने एका पोलिसासह दोन मोटरसायकल आणि एका मालवाहू जीपला धडक दिली. जीवितहानी झालेली नसली तरी पाच जणांनाही दुखापत झाली आहे. गडगा ते मुखेड जाताना अपघात झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, खासदार प्रताप चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार राम रातोळीकर, माधवराव साठे, बालाजी बच्चेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
दरम्यान, लातूरमध्ये फडणवीस यांनी विधान केले की, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सोयाबीनसह सर्व पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना जोपर्यंत मदत मिळणार नाही, तोपर्यंत राज्य सरकारला झोपू देणार नाही. वेळप्रसंगी आंदोलने करून झटका दाखवू असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लातुरात रविवारी दिला.
लातूर जिल्ह्यातील वांजरवाडा तसेच अन्य भागातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी फडणवीस यांनी केली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.