सोलापूर : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपच्या मंत्र्याने चिरडले. भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट घटना आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) या क्रूर घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत कारवाईची मागणी केली.
आज मंगळवारी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देशभर या घटनेच्या निषेधार्थ निदर्शन कार्यक्रम करण्यात आले. त्या अनुषंगाने सोलापुरात अखिल भारतीय महिला जनवादी संघटनेच्या राज्याध्याक्षा नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे निदर्शने करण्यात आली.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले असून राज्यमंत्री यांच्या मुलाने एका शेतकऱ्याला गोळ्या घालून मारल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र टेनी याने व त्याच्या गुंडांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट घटना आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) या क्रूर घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे, असे मत सिटूचे राज्य सचिव कॉ. युसुफ शेख यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना किसान सभेचे नेते सिद्धप्पा कलशेट्टी म्हणाले, केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांना तातडीने बडतर्फ करा, त्यांचा मुलगा व त्याच्याबरोबर हल्ल्यात सामील असणाऱ्या सर्वांवर 302 कलमाखाली हत्येचा गुन्हा दाखल करा व सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा, आणि मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तसेच जखमी शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली.
आपल्या कॉर्पोरेट साथीदारांना शेतीचे संपूर्ण क्षेत्र नफा कमावण्यासाठी व अनिर्बंध मक्तेदारी निर्माण करण्यासाठी बहाल करण्याच्या अत्यंत कुटील हेतूने केंद्र सरकारने तीन केंद्रीय कृषी कायदे केले आहेत. आपल्या कॉर्पोरेट भागीदारांना नफा कमावता यावा यासाठी प्रसंगी शेतकऱ्यांचे बळी घेत केंद्र सरकारला हे कायदे अमलात आणायचे आहेत. मात्र संयुक्त किसान मोर्चा केंद्र सरकारचे हे कुटील कारस्थान कधीही साध्य होऊ देणार नाही. संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व अखिल भारतीय किसान सभा, अत्यंत नेटाने लोकशाही चौकटीत व शांततेच्या मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवेल, अधिक तीव्र करेल व जोपर्यंत हे तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द केले जात नाहीत व शेतकऱ्यांना शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी किफायतशीर आधार भावाचे संरक्षण देणारा केंद्रीय कायदा केंद्र सरकार करत नाही, तोपर्यंत आपला लढा सनदशीर मार्गाने सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.
यावेळी घोषणा देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेविका कामिनीताई आडम, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख, सलीम मुल्ला, सुनंदाताई बल्ला, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, बाबू कोकणे, दीपक निकंबे, विल्यम ससाणे, वीरेंद्र पद्मा, अमित मंचले, अनिल वासम, नरेश दुगाणे, शहाबुद्दीन शेख, श्रीनिवास गड्डम, असिफ पठाण, अकिल शेख, बालाजी गुंडे, बजरंग गायकवाड, प्रवीण आडम, हसन शेख, बापू साबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.