मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, मुंबईत आतापर्यंत 8 बेस्ट बसेसची तोडफोड झाली आहे, धारावी, शिवाजी नगर, देवनार, मालवणी येथे बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, बंदचे आवाहन करतांना कोणावरही जबरदस्ती करणार नाही. तसेच, कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान करणार नसल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेकडून सांगण्यात आले होते.
महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन सर्व बंद करणार आहेत. या बंदला आम आदमी पक्ष, सीपीआय, सीपीएम, समाजवादी पक्ष, शेकाप, किसान सभा, कामगार संघटना, लाल निशाण पक्ष, युवक क्रांती दल, अखिल भारतीय किसान समिती यांनी पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. मात्र, राज्यभरातील एसटी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. आधीच एसटी महामंडळात तोट्यात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देणे मुश्कील होत आहे. तसेच, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी बस आज सुरुच ठेवण्यात येणार आहे.
सत्ताधारी पक्षांनी बंद पुकारल्याची घटना कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. मात्र, या बंदला राज्यातील व्यापाऱ्यांनी व दुकानात काम करणाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. आम्ही लखीमपूरच्या घटनेचा निषेध करतो. काळ्या पट्ट्या लावून काम करणार आहे. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत. प्रचंड कर्ज अंगावर आहे. दुकानात काम करणाऱ्यांचे पगार देणेही अवघड झाले आहे, असे व्यापाऱ्यांनी सरकारला म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्र बंदमुळे पुण्यातील पीएमपीएल बससेवा बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे पुणेरकरांची गैरसोय होताना दिसतेय, कुठलीही सूचना न देता पीएमपी बसेस अचानक बंद केल्यामुळे, कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांसाठी तरी बसेस सुरू ठेवल्या पाहिजे होत्या, अशी मागणी यावेळी प्रवाशांनी केली. पीएमपीएल बसेस बंद असल्यामुळे रिक्षाचालकही जादा पैशांची मागणी करत आहेत.
उत्तर प्रदेशातील लाखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक परिसरात ठिय्या आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला . पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच, राष्ट्रवादी पदाधिकरी संदीप देसाई यांनी अटक केली तर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेऊ असा इशारा दिला. पोलिसांनी संदीप देसाई यांच्यासह सर्वांनाच ताब्यात घेतलं.
बीडमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बीड बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते. त्याच धर्तीवर बीड मध्ये नागरिक व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग नोंदविला आहे. सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आले आहे. दरम्यान शिवसैनिक रस्त्यावर उतरत केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली आहे. शिवाय दुकान उघडे ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी दाखविण्यात आलीय.
* महाराष्ट्र बंद – काही ठिकाणी दुकाने बंद, काही शहरात बसेस बंद
– वाशी, पुणे, नाशिक बाजारसमित्यांचे व्यवहार ठप्प
– पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीएमएल बससेवा बंद, काही भागातील दुकाने बंद – नांदेड जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, धुळ्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त
– सांगली जिल्ह्यात व्यापाऱ्यांचा दुपारी दोन वाजेपर्यंत बंद
– मुंबई, नागपूर, रत्नागिरी, कोल्हापूर, मनमाड, नंदुरबारमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद, – ठाण्यात बससेवा बंद