नवी दिल्ली : आता 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना कोरोनावरील कोवॅक्सीन लस देता येणार आहे. कारण, याबाबतची मंजूरी मिळाली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोवॅक्सीन लस तयार केली आहे. केंद्र सरकारकडून लवकरच याबाबतची गाईडलाइन्स जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर लहान मुलांना लस देण्याची सुरुवात होणार आहे.
शास्त्रज्ञांनी अनेक अभ्यासांमध्ये स्पष्ट केले आहे की ज्यांना अद्याप लसीकरण केले गेले नाही त्यांना करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असू शकतो. या संदर्भात, मुलांमध्ये संक्रमणाचा धोका जास्त असण्याची भीती आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होती त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यातच कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त धोकादायक असल्याचं सांगितलं जात होतं.
अशातच आता लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतात 2-18 वयोगटासाठी कोव्हॅक्सीन लशीला मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डीसीजीआयनं कोव्हॅक्सीन लशीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता 2 वर्षापुढील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेता येणार आहे. तिसरी लाट येण्यापूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी जास्त धोका नसल्याचा पाहायला मिळालं. मात्र येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याची शक्यता अनेक वैद्यकीय सल्लागारांनी दिली होती. अशातच आता यामध्ये दिलासादायक बातमी समोर आली आहे.
मुलांवर कोवॅक्सीनच्या क्लिनिकल चाचण्या म्हैसूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्थेशी (एमएमसीआरआय) संलग्न चेलुवंबा हॉस्पिटलमध्ये केल्या जात आहेत. या अनुक्रमात रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवले गेले आहेत, जेणेकरून मुलांमध्ये लसीमुळे शरीरात निर्माण झालेली प्रतिपिंडे तपासली जातील. सूत्रांनी सांगितले की, या चाचणीतून मिळालेल्या अहवालाच्या आधारावर, डीसीजीआय लसींच्या प्रभावीतेची खात्री केल्यानंतर मुलांसाठी लसीच्या आणीबाणीच्या वापरास मंजुरी देऊ शकते, असे वृत्त होते. त्यानुसार मंजुरी मिळाली आहे. लहान मुलांना लस देण्याची सुरुवात होणार आहे.