सोलापूर : मावळते पोलीस आयुक्त शिंदेंना निरोप तर नवे पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी काल सोमवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. सोलापूर शहरात पोलीस आयुक्त म्हणून आल्यानंतर मला काम करण्याची चांगली संधी मिळाली आणि मला मिळालेल्या संधीचा फायदा सोलापूरमधील सर्वसामान्यांच्या हितासाठी केला, असे उद्गार सोलापूरचे मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढले.
पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉ.दिपाली धाटे, डॉ. वैशाली कडुकर आदी उपस्थित होते.
सोलापूर मध्ये चांगली क्षमता आहे. अनेक कलावंत, कलाकार, उद्योजक आहेत. या शहरात चांगले काम करण्याची संधी मला मिळाली आणि ती मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. लोकांमध्ये गरीबी आहे, त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांना कायद्याच्या चाकोरीत बसून कारवाई करण्यात आली. अनेक सावकर असतील, वाळू आणि जमीन माफियांवर कठोर कारवाई करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात यश मिळाले.
प्रत्येक पोलिसांनी चांगले काम केल्यास शहर सुरक्षित राहणार आहे, असेही मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले.
प्रारंभी पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी आपल्या प्रास्ताविकातून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या कार्यर्किदीचा आढावा मांडला. सोलापूरमध्ये त्यांनी पदभार घेतल्यानंतर कोरोना असो की अन्य काही कारवाई यामध्ये कोणताही दुजाभाव न ठेवता उत्तम काम केले.
मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून त्यांनी येवून 1990 मध्ये पोलीस दलात भरती झाले. पोलीस उपाधिक्षक म्हणून त्यांनी नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, जळगांव, मुंबई, रायगड, ठाणे, नंतर 31 मे 2019 रोजी सोलापूर शहर पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतला पुन्हा ते मुंबईकडे जात आहेत. असेही बांगर यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांचे मार्गदर्शन केल्याने अनेक नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळाले, असे आपल्या मनोगतामधून अनेकांनी व्यक्त केले. त्यामध्ये पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर, डॉ.दिपाली धाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी, प्रिती टिपरे, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, संजय पवार, राजेंद्र बहीरट, उदसिंह पाटील पोलीस हवालदार तारानाईक यांच्यासह अनेकांनी व्यक्त केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना पुष्पगुच्छ आणि भेट वस्तु देवून निरोपाचा सत्कार करण्यात आला. शेवटी हवालदार बनजगोळे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह उद्योजक गिरीष दर्बी, सुहास आदमाने, मनोज शहा, प्रविण भुतडा, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
19 वे पोलीस आयुक्त हरिष बैजल –
नवे पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचा काल पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्त कार्यालयातील रजिस्टरवर सही करून सोलापूर शहराचे 19 वे पोलीस आयुक्त म्हणून हरिष बैजल कार्यरत झाले. त्यानंतर मावळते पोलीस आयुक्त शिंदे यांनी बैजल यांना सोलापूर शहराबाबत आणि पोलीस आयुक्तालयाबाबत विस्तृत माहिती दिली.
नागरिकांनो पोलिसांना घाबरू नका…आपल्या तक्रारी, अडीअडचणी प्रामाणिकपणे पोलिसांना सांगा,समन्वय ठेवा, नागरिक अन् पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्याबरोबरच पोलिसांबद्दल समाजात असलेली भिती दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत सोलापूर शहर पोलिस दलातील नूतन पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी व्यक्त केले.
सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी आज मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष व इतर विभागाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. प्रारंभी आजपर्यंतच्या पोलिस दलातील कारकिर्दीविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजचा माझा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे सर्व विभागांची माहिती घेऊन पुढे काय करायचे त्याबाबत ठरविणार आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय आवश्यक आहे, जनतेने पोलीसांना घाबरू नये, समन्वय ठेवावा असे सांगितले. असे सांगतानाच सायबर क्राईम बाबत बोलताना त्यांनी नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये, चूका या आपण स्वतः करतो त्या होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, ऑनलाइन फसवणूक गुन्ह्यांना आवर घालता येईल.
शहरातील नागरिकांचे प्रबोधन करुन वाहतुकीला शिस्त लावणार, त्यासाठी शाळांचा उपयोग करून घेणार अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली घाटे, उपायुक्त वैशाली कडुकर, उपायुक्त बापू बांगर आदी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
* देवदर्शनासाठी गेल्यावर घरात चोरी
सोलापूर – येथील मजरेवाडी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 79 हजार 100 रूपयाचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवार, 8 आक्टोंबर रोजी घडली.
मनोज अभिमान माने (वय 27, रा. प्लॉट नं. 146, रा. ललिता नगर, शांती नगर जवळ, मजरेवाडी सोलापूर) हे कर्नाटकातील बेळगावी येथे देवदर्शनासाठी गेले होते जाताना त्यांनी त्यांच्या घराला कुलूप लावले असताना अज्ञात चोरट्याने त्याचा गैरफायदा घेवून घराला लावलेले कुलूप व सेंट्रल लॉक कशानेतरी तोडून आत प्रवेश केला.
बेडरूम मधील कपाटात असलेले सोन्याचे 34 हजार 400 रूपयाचे गंठण, सोन्याचे 39 हजाराचे नेकलेस, 4 हजाराची सोन्याची अंगठी, 1 हजाराचे चांदीचे पैंजण, 700 रूपयाचे चांदीचे लॉकेट असा एकूण 79 हजार 100 रूपयाचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. अशी फिर्याद मनोज माने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर करीत आहेत.