सोलापूर : 10 हजार विडी कामगारांच्या गोदुताई परुळेकर घरकुल वसाहतीत 50 हजार च्या घरात लोकसंख्या पोहोचली. तब्बल 15 वर्षांपासून येथील रहिवासीकडून अंतर्गत मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी शासन आणि प्रशासन दरबारी पाठपुरावा चालू आहे. आता आनंदाची बातमी आली आहे. कॉ गोदुताई परूळेकर वसाहतीत पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घोषित केला आहे.
अनेक अडचणी व राजकीय आकसापोटी कामाला विलंब होत राहिला. महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंगळवार,12 ऑक्टोबर रोजी कॉ. गोदुताई परुळेकर वसाहतीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांना मंत्रालयात आमंत्रित केले व स्वतंत्र बैठक घेण्यात आली.
या बैठकीत गोदुताईला 31 डिसेंबर 21 पर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत घोषित करा. रस्ते दुरुस्ती व पुनर्रडांबरीकरणासाठी 1 कोटी 50 लाख निधीची तरतूद करा,जल जीवन मिशन योजना अंतर्गत पाण्यासाठी 30 कोटी निधीची तरतूद करा, तसेच अंतर्गत मलनिस्सारणसाठी 60 कोटींची गरज असून स्वच्छ भारत अभिमान योजना अंतर्गत मंजूर करण्याच्या संस्थेच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली.
महत्त्वाचे निर्णय संबंधित विभागाचे प्रधानसचिव, संबंधित सक्षम अधिकारी यांच्या समक्ष झाले असून संबंधित अधिकारी वर्गाला युद्धपातळीवर कार्यवाही पूर्ण करण्याचे चे आदेश दिले. वास्तविक पाहता यासाठी वारंवार मोर्चे, धरणे आंदोलन, निवेदने, बैठका, पत्रव्यवहार या सनदशीर मार्गाद्वारे संघर्ष करावा लागला. आजचे हे निर्णय ही त्याची फलश्रुती आहे, असे कॉ. गोदुताई परुळेकर वसाहतीचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंद व्यक्त केले. ही कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीकरीता ही दिवाळी भेट असेल, असे ही ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कॉ. गोदुताई परुळेकर विडी वसाहतीत जवळपास 40 ते 50 हजार लोकसंख्या आहे. महिन्याला फक्त तीनच दिवस पाणीपुरवठा होत आहे, 16 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेले मुख्य रस्ते पूर्णपणे उखडलेले आहे. कॉ आडम मास्तर हे आमदार असताना सन 2005 आणि 2008 मध्ये शासनाकडुन 5 कोटी निधी आणल्यामुळे हे रस्ते झाले आहे.
स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याकारणाने साफसफाई होत नाही. ठिकठिकाणी कचरा साचत आहे. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता जास्त आहे. या करिता गेल्या 4 वर्षापासून पाठपुरावा सुरूच होता. त्या अनुंषगांने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी 12 अॉक्टोबर 21 रोजी सकाळी 11.00 वाजता मंत्रालयात बैठक बोलावली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले. बैठकीस राजेश कुमार मिना, अप्पर मुख्य सचिव ग्राम विकास विभाग देशमुख, उपसचिव ग्रामविकास विभाग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे ग्राम विकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर आदी उपस्थित होते.
दुपारी 1.00 वाजता गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री) यांच्या मुख्य कार्यालयामध्ये बैठक झाली. बैठकीमध्ये गोदुताई वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असुन महिन्यातुन तीन तीन वेळाच पाणी पुरवठा होत आहे यावर उपाय योजना करावी म्हणून हिप्परगा तलावामधून 6 एम.एल.डी.पाणीपुरवठा योजना राबवावी म्हणुन आग्रह करण्यात आला, त्यानुसार ऑक्टोंबर 2021पर्यंत या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.
कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी सुध्दा 10 टक्के लोकवर्गणी भरण्याची तयारी दर्शवली असुन ह्या योजनेचा तीस कोटी निधी जलजीवन मिशन योजने अंतर्गत तरतुद करा अशी विनंती केली. तसेच वसाहती लिचपिट, शौषखड्डे चे आयुष्य संपलेले असुन त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या वसाहतीमध्ये 60 कोटीची ड्रेनेजची योजना ही स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मंजूर करावी, अशी मागणी केली, त्यास सुध्दा तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात रे नगर फेडरेशन अध्यक्ष कॉ नलिनी कलबुर्गी, रे नगर सचिव युसुफ शेख, व्यस्थापक वसीम मुल्ला, विल्यम ससाणे, दाऊद शेख, नरेश दुगाणे, संगीता एडके, आरिफा शेख, इंदुबाई भुरे आदींची उपस्थिती होती.