सोलापूर : जरंडेश्वर साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींची भागीदारी आहे, असा आरोप करत बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून अजित पवारांनी अवैध संपती जमा केली असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज सोलापुरात केला.
किरीट सोमय्या आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबियांवर मोठे आरोप केले आहेत. अजित पवारांच्या बहिणी जरंडेश्वर कारखान्यात भागीदार आहेत आणि याबाबतचे पुरावे मी ईडीला पाठवणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तत्पूर्वी एम्प्लॉयमेंट चौक येथील शांतीसागर मंगल कार्यालय येथे भाजपाच्या नेते- कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
“माझं शरद पवारांना चॅलेंज आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे मी उद्या ईडी आणि आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयालाही पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं चौकशीचे आदेशही दिले आहेत. यातील एकही कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार, सुप्रीया सुळे यांनी सिद्ध करुन दाखवावं, असे आव्हान दिले.
किरीट सोमय्या म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या. यावेळी राजकीय आकसातून माझ्या नातेवाईकांवर कारवाई केली जात आहे, असा दावा अजित पवारांनी केला होता. मात्र पुराव्यांच्या आधारेच ही कारवाई करण्यात आली आहे, असा दावा सोमय्यांनी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
किरीट सोमय्या म्हणाले की, “ठाकरे सरकारचं रिमोट कंट्रोल असणाऱ्या शरद पवारांनी अजित पवारांच्या घरावरील आयकर विभागाच्या धाडींसंदर्भात वक्तव्य केलं. पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की, इंडोकोम प्रा. लि. कोणची आहे? त्यांनी अजित पवार यांना 100 कोटी किती वर्षांपूर्वी दिले होते?”
अजित पवार यांच्या बहिणी विणा पाटील, निता पाटील आणि विजया पाटील यांची जरंडेश्वर साखर कारखान्यांत भागीदारी आहे; मग अजित पवारांनी बेनामी संपत्ती बहिणीच्या नावावर जमा केली आहे का असा सवाल करीत अजित पवारांनी आपल्या बहिणींशी बेईनामी केली आहे का, शरद पवारांना ही बेईनामी मान्य आहे का, असा सवालही साेमय्यांनी केला.
राज्यातील गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तच खंडणी घेतात; मग जनतेने कोणाकडे न्याय मागायचा. यामुळेच मी आता भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच जरंडेश्वर कारखान्या संदर्भातील पुरावे उद्या सक्तवसुली संचालनालय ( ईडी ) कार्यालयात सादर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळातील ठाकरे सरकारच्या आर्थिक घोटाळ्यामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, असा आरोपही सोमय्या यांनी केला.