मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तसेच लसीकरणाचे प्रमाणही वाढलेले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
सर्वात कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. त्यात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती देत कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्यांना आणखी एक दिलासा दिला आहे. लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही राज्य सरकार निर्बंधातून मुक्त करणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. मात्र, हा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
वाढत्या लसीकरणामुळे हर्ड इम्युनिटीकडे राज्य वाटचाल करत असून, दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घट लक्षात घेऊन राज्य सरकार निर्बंध शिथिल करत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये बऱ्याच गोष्टी सुरू केल्या आहेत. शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहं-नाट्यगृहं यासह इतरही सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर राज्य सरकार आता एक लस घेतल्यांनाही सर्व ठिकाणी प्रवेश देण्याच्या आणि राज्यात संपूर्ण अनलॉक करण्याच्या विचारात आहेत, तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
‘दिवाळीनंतर कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही मॉल्स, लोकल रेल्वे तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत. दिवाळीनंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना सामोरं जावं लागत असलेल्या या असुविधेतून सुटका करण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. टास्क फोर्सच्या सहमतीने मुख्यमंत्री दिवाळीनंतर निर्णय घेतील’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी बोलताना टोपे म्हणाले, ‘राज्यात मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभागाची सहमती असेल तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांचा कालावधी दुसऱ्या डोससाठी दिलेला आहे. त्यामुळं मोठं अंतर असल्यानं असुविधा होते. त्यामुळे आरोग्याविषयक बाब लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाईल’, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.