सोलापूर : बेकायदा डिझेलची निर्मिती आणि त्याची विक्री करणाऱ्या 9 जणांना अटक करून त्यांच्याकडून 17 कोटी 20 लाख 90 हजाराचा मुद्देमाल शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
तानाजी कालिदास ताटे (मुपो मानेगांव, ता. बार्शी, जि. सोलापूर), युवराज प्रकाश प्रबळकर (रा. पंचशील नगर, वैराग, ता.बार्शी जि. सोलापूर), आकांक्षा ट्रॅव्हल्सचा मालक अविनाश सदाशिव गंजे (रा.86,/1/ अ भवानी पेठ चडचणकर अपार्टमेंट सोलापूर), सुधाकर सदाशिव गंजे (वय 44, रा. घर नं.257/58, अवंती नगर पुना नाका सोलापूर), मॅनेंजर श्रीनिवास लक्ष्मण चव्हाण (रा.जी 2, अभिषेक नगर, हॉटेल अॅब्यॅसिडर जवळ सोलापूर), बस चालक हाजू लतिफ शेख, (मुपो कौडगांव, ता. जि. उस्मानाबाद), हिमांशु संजय भुमकर (वय 21, रा. भुमकर कॉलनी बार्शी रोड वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्यासह साई पेट्रो स्पेशॅलिटीज लिमिटेड या कंपनीचे दोघे असे 9 जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, जुना पुना नाका परिसरात असलेल्या समर्थ हॉटेल शेजारील आकांक्षा ट्रॅव्हल्स येथे दि. 15 आक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका टँकर मधून बस मध्ये डिझेल सदृष्य केमिकल भरण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी छापा टाकला. त्यावेळी एक टँकर, तीन बस आणि डिजेल सदृष्य केमिकल जप्त करण्यात आले.
त्यानंतर हा टँकर कोठून आला याचा तपास केल्यानंतर तो वैराग येथील हिमांशू भुमकर यांनी पाठवल्याचे समजल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील मुपो खुपरी ता. वाडा येथे साई ओम पेट्रो स्पेसिलिटीज लिमिटेड या कंपनीतून हा टँकर आल्याचे सांगण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी तेथे जावून चौकशी केली असता त्या कंपनीला मोठ्या जहाजातील तेलाचे शुध्दीकरणाचे कामाचा परवाना असताना त्यांनी डिझेलमध्ये कोणतेतरी केमिकल घालून ते बेकायदा विक्री करीत असल्याचे उघड झाले.
त्यावरून पोलीसांनी कंपनीतील सर्वसाहित्य आणि कंपनीची जमीन सील करून जवळपास 16 कोटी 19 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या सर्व प्रकारावरून शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या सर्व आरोपींविरूध्द जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
त्यांच्याकडून एकूण 17 कोटी 20 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरिश बैजल, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, नंदकिशोर सोळुंके, श्रीनाथ महाडिक, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हवालदार सुहास आखाडे, दिलीप किर्दक, अशोक लोखंडे, अमित रावडे, इमाम इनामदार यांनी पार पाडली.