नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला हरयाणाच्या पंचकुला येथे सीबीआयच्या विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर चार आरोपींनाही जन्मठेप देण्यात आली आहे. राम रहीम आणि इतरांना 2002 मध्ये माजी डेरा सदस्य रणजीत सिंग यांची हत्या केल्याप्रकरणी 8 ऑक्टोबरला दोषी ठरवण्यात आले होते. आज शिक्षा सुनावण्यात आली. तर आधीच राम रहीम बलात्काराच्या प्रकरणात 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे.
पंचकुला येथील विशेष सीबीआय कोर्टात आज सोमवारी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग आणि अन्य चार जणांना डेराचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या 2002 मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. तब्बल 19 वर्षांनी पंचकुलाच्या सीबीआय कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे. याआधी 8 ऑक्टोबर रोजी राम रहीम याच्यासह चार जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. राम रहीम,कृष्ण लाल,सबगिल,अवतार आणि जसबीर या आरोपींना दोषी ठरवण्यात आले. यातील एक आरोपी इंद्रसेन याचा मृत्यू झाला आहे.
8 ऑक्टोबर रोजी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत आणि आणि अन्य चौघांना दोषी ठरवण्यात आले. भोंदु गुरु सिद्ध झालेल्या गुरमितच्या आश्रमात लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्याच्या आश्रमात पोर्नोग्राफीच्या सीडी, लैंगिक शक्ती वाढवणारी औषधे, स्टेरॉइड्स, कंडोम आदी आक्षेपार्ह वस्तू सापडल्याचे उघड झाले होते. अध्यात्मिकतेच्या आड महिलांना फसवण्याचे उद्योग येथे चालत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, गुरमितला शिक्षा सुनावली जाण्यापूर्वी, हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यात क्रिमिनल प्रोसीजरच्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. डीसीपी मोहित हांडा म्हणाले, “राम रहिम आणि अन्य चौघांना शिक्षा सुनावल्यानंतर जीवीत आणि मालमत्तेच्या नुकसानीची भीती, जिल्ह्यात कोणताही तणाव निर्माण करणे, शांतता भंग होणे अशी शक्यता आहे. त्यामुळे कलम 144 आज लागू करण्यात आले आहे.” यापूर्वी बलात्काराच्या प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या हिंसाचारात 36 जण ठार झाले होते. या पार्श्वभूमीवर विस्तृत सुरक्षा उपाययोजना करण्यात आली आहे.
डेराचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंह, जे पंथाचे अनुयायी होते, त्यांची 2002 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. एका निनावी पत्राच्या प्रसारणात त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे त्यांची हत्या करण्यात आली होती, ज्यात संप्रदाय प्रमुखांकडून महिलांचे लैंगिक शोषण कसे केले जात आहे हे सांगण्यात आले होते. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, डेरा प्रमुखांचा असा विश्वास होता की रणजीत सिंह हे निनावी पत्र प्रसारित करण्यामागे होते आणि त्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला. 2017 मध्ये गुरमीत राम रहीम सिंगला दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. दोन वर्षांपूर्वी, पंथ प्रमुखांना पत्रकार रामचंद्र छत्रपतीच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.