नवी दिल्ली / सोलापूर : सहकारी साखर कारखानादारीच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील यंदाच्या वर्षांसाठीची (२०२१) गुणवत्ता पारितोषिके जाहीर करण्यात आले. त्यामध्ये २१ पारितोषिक पटकावून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे.
हा पारितोषक वितरण कार्यक्रम १६ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, रस्ते व परिवहन विकास मंत्री नितिन गडकरी, वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोरोना साथीमुळे गेल्यावर्षी पारितोषिक वितरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षीची व या वर्षाची पारितोषिके एकाच वेळी वितरीत करण्यात येणार आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ भाजप आमदार प्रशांत परिचारक अध्यक्ष असलेल्या सोलापूरच्या श्री पांडुरंग कारखान्याला मिळाला आहे. या कार्यक्रमानिमित्ताने पवार आणि अमित शहा एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
यंदा देशातील २८४ पैकी १०८ सहकारी साखर कारखान्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज या पारितोषकांची घोषणा केली. देशातील १०८ सहकारी कारखान्यांचे यानिमित्ताने विविध निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले.
महाराष्ट्रातील ४६ कारखाने यात सहभागी होते. मूल्यमापनासाठी सरासरी दहा टक्के व त्याहून अधिक साखरेचा उतारा असलेले आणि दहा टक्क्यांपेक्षा कमी उतारा असलेले कारखाने दोन गटात वर्गवारी करून मूल्यमापन करण्यात आले. तसेच यंदा एका कारखान्याला एकच पारितोषिक असा मापदंड लावून हे मूल्यमापन सर्वसमावेशक करण्यात आले.
* श्री पांडुरंग कारखान्याकडून ऊस वाहतूक ठेकेदारांना 12.50% वाहतूक दरवाढ
श्रीपूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपूर यांनी मागील बऱ्याच दिवसापासून वाहतूक ठेकेदारांच्या वाहतूक दरवाढीबाबत असणाऱ्या मागणीबाबत तोडगा काढून गळीत हंगाम 2021-22 च्या सुरुवातीपासून 12.50 टक्के वाहतूक दरवाढ देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शावर कारखान्याची उत्तमप्रकारे वाटचाल सुरु असून त्यांच्या कृपाशिर्वादाने कारखान्याचा गळीत हंगाम 2021-22 सुरु झाला असून या हंगामात कारखान्याकडून ऊस गाळपास सुरवात झालेली आहे. पाठीमागील दोन वर्षापासून वाहतूक ठेकेदारांच्या डिझेल खर्चामध्ये वाढ झाल्याने त्यांनी डिझेल दरवाढ देणेबाबतची मागणी केली होती. सदरच्या मागणीस अनुसरुन व वाहतूक ठेकेदारांच्या होणाऱ्या डिझेलवरील खर्चावर विचार करण्यात येऊन डिझेलचा दर व कारखान्याचा वाहतूक दर याचा समतोल साधत कारखाना व्यवस्थापनाने ही दरवाढ देण्याचे निश्चित केले असलेचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.
कारखान्याकडील तोडणी ठेकेदार यांची दरवाढ ही शासन स्तरावर होवून त्यांच्या दरवाढीची अंमलबजावणी करणेबाबत कारखान्यांना कळविण्यात येते. परंतु वाहतूक ठेकेदार यांना कारखाना स्तरावरच वाहतूक दरवाढ द्यावी लागते. गतवर्षी तोडणी ठेकेदारांना ही त्यांच्या संघटनेने व शासनाने संयुक्तपणे तोडणी दरात वाढ दिली होती. त्याची अंमलबजावणी कारखान्यांनी पूर्वीच केलेली आहे.
महाराष्ट्रातील वाहतूक संघटनांनी चालू वर्षी संपाचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच वाहतूक ठेकेदारांना वाहतूक दरवाढ दिल्याने वाहतूक ठेकेदार खुष असून त्यांनी कारखान्यास सुरळीत ऊस पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक दरवाढीची अंमलबजावणी कारखाना गळीत हंगाम 2021-22 च्या सुरुवातीपासूनच करीत असल्याने या हंगामामध्ये वाहतूक ठेकेदारांना वाहतूक दरामध्ये जास्तीची रक्कम मिळून त्यांचा आर्थीक फायदा होणार आहे.
श्री पांडुरंग कारखान्याने नेहमीच शेतकरी, तोडणी व वाहतूक ठेकेदार यांचे हित जोपासले असून यांच्या पाठीशी उभा राहून अडीअडचणीच्या वेळी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणेच याहीवर्षी वाहतूक ठेकेदारांना वाहतूक दरवाढ दिलेली आहे.
– डॉ.यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक