नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात आज सायंकाळी ७ वाजता सामना होणार आहे. दोन्ही देशात जवळपास दोन वर्षांनंतर क्रिकेट सामना होत आहे. ‘या संघात प्रतिभावान खेळाडू आहेत आणि ते भारताला पराभूत करतील. इंशा अल्लाह पाकिस्तान नक्की भारताला पराभूत करेल’, अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अतिआत्मविश्वास व्यक्त केला आहे. कारण वर्ल्डकपमध्ये भारताने नेहमीच पाकिस्तानचा पराभव केला आहे.
टी-२० वर्ल्डकप- आज भारत विरूद्ध पाकिस्तान टी-२० वर्ल्डकपमध्ये आज (रविवार) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सुपर १२ मधील पहिला सामना आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
भारत आणि पाकिस्तानची लढत होणार हे जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याची तयारी सुरू केली आहे. आता ही लढत जस जशी जवळ येत आहे तस तशी उत्सुकता आणखी वाढत चालली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आयसीसीच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे पाकिस्तानविरुद्धचे रेकॉर्ड बिनतोड आहे. दोन्ही देशात वनडे आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये झालेल्या एकाही लढतीत भारताचा पराभव झालेला नाही. या दोन्ही संघात १९९२ साली सर्वप्रथम वर्ल्डकपमध्ये लढत झाली होती. त्या वर्षी भलेही पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला असला तरी भारताविरुद्ध त्यांना विजय मिळवता आला नव्हता.
२००७ पासून सुरू झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये देखील भारताने आतापर्यंत झालेल्या पाचही लढतीत विजय मिळवला आहे. दोन्ही देशात द्विपक्षीय क्रिकेट होत नसल्याने चाहत्यांना आयसीसीच्या स्पर्धांची वाट पाहावी लागते. या सामन्याचा प्रेक्षक फक्त भारत आणि पाकिस्तानमध्ये नाही तर जगभरात असतो. यामुळेच प्रसारकांची देखील मागणी या दोन्ही देशांच्या लढती अधिक व्हाव्यात अशीच असते. आयसीसीने देखील या वर्षी या दोन्ही संघांना एकाच गटात टाकले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकपेक्षा जास्त लढत होण्याची शक्यता आहे.
हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाईल. सामन्याची नाणेफेक सायंकाळी ७ वाजता होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहू शकाल. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, हे इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील पाहिले जाऊ शकते.