मोहोळ : गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आपापली भूमिका पार पाडावी. यापूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ५८ मराठा मोर्चे निघून देखील त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास लाँग मार्च काढण्यात येईल, असा इशारा भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी येथे दिला.
मोहोळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. खा. संभाजीराजे यांचे मोहोळ शहरात आगमन झाल्यानंतर शिवाजी चौकात त्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोटर सायकल रॅलीचे नियोजन असताना देखील संभाजीराजे यांनी सभागृहापर्यंतचे दोन किमी अंतर चालत जाऊन लाँग मार्च रंगीत तालीम केली. याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात देखील केला.
यावेळी मंचावर सकल मराठा समाजाचे रायगड समन्वयक अंकुश जाधव, राजेंद्र कोंढरे, गंगाधर काळकुटे, प्रकाश देशमुख, धनंजय जाधव, राजन जाधव, माऊली पवार, दत्ता मुळे, डॉ. स्मिता पाटील, शुभांगी लुंबे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले की, लाँग मार्चची रंगीत तालीम आज आपण पाहिली आहे. प्रत्येकी ३५ किमी अंतराचे टप्पे करून आपण मुंबई गाठायची आहे. ज्या ठिकाणी मुक्काम होईल त्या ठिकाणी मी देखील राहणार आहे. छत्रपती सुद्धा रयतेच्या जवळ राहू शकतात हे आपण राज्यकर्त्यांना दाखवून देऊ.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी बोलताना मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक माऊली पवार म्हणाले की, आम्ही कोणत्या पक्षाचे अथवा कुणाचे विरोधक नाही. मात्र सध्याच्या मंत्रीमंडळातील एक मंत्री युपीएससीतून निवडलेल्या चार मराठा जिल्हाधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांवर डोळा ठेऊन आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरु ठेवणार आहे. यावेळी आरक्षणाच्या अभ्यासक व मराठा समाजाचे नेते राजेंद्र कोंढारे यांनी मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षीयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करुन धोरणात्मक निर्णयामध्ये मराठा समाजाला प्रतिनिधीत्व पाहिजे, अशी मागणी केली.
या जनसंवाद मेळाव्यासाठी माजी आमदार राजन पाटील, उमेश पाटील, संजय क्षीरसागर, बाळासाहेब गायकवाड, अशोक भोसले, तुकाराम भोसले, अजिंक्यराणा पाटील, नागेश साठे, संतोष गायकवाड, प्रमोद डोके, अँड. श्रीरंग लाळे, हिंदूराव देशमुख, सत्यवान देशमुख, सुनील चव्हाण, विकी देशमुख, महेश देशमुख, तानाजी चटके, वैभव गुंड, अरुण भोसले, नागेश क्षीरसागर, पिंटू गायकवाड, डॉ. स्मिता पाटील, डॉ. प्रमोद पाटील, राजरत्न गायकवाड, नागेश वनकळसे, संजय पडवळकर, सिमाताई पाटील, माऊली पवार, सतीश काळे, सतीश पाटील, शाहूराजे देशमुख, रमेश माने, सत्यवान देशमुख, सोमनाथ पवार, प्रविण डोके, प्रकाश चवरे, शिवाजी चव्हाण, जहिरुद्दीन पठाण इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या शेवटी अँड. श्रीरंग लाळे यांनी आभार मानले. यावेळी जहिरुद्दीन पठाण यांच्या वतीने संभाजीराजेंना “शिवबा जन्मवा पण दुसऱ्याच्या घरात” या पुस्तकाचा संच भेट देण्यात आला.