बीड : आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी (ता. 31) राज्यभरात परीक्षा होणार आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक दोन नव्हे, तर तब्बल 34 हॉलतिकीटे आली आहेत. पृथ्वीराज गोरे असे विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यासमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ संपायचे नाव घेत नाही. परीक्षेचे आरोग्य बिघडत असून निश्चित निदान होत नसल्याचे म्हणावे लागेल. आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराच्या नावे तब्बल ३४ हॉलतिकिटे आली आहेत. या प्रकारामुळे त्याच्या जीवाला घोर लागला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बीड तालुक्यातील शहाबाजपूर येथे राहणार्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याने 20 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी आभासी अर्ज केला होता. यासाठी 630 रुपये शुल्कही भरले होते. यात त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती. गट क पदासाठी 24 ऑक्टोबरला परीक्षा झाली असून, आता गट ड साठी रविवारी परीक्षा होत आहे. परंतु, यातही मोठा गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रकारामुळे या विद्यार्थ्याला मनस्ताप सहन करावा लागतो. प्रत्येक हॉलतिकीटवर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. या निमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रत्येक हॉलतिकिटावरील परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आला आहे. यामुळे उमेदवाराने नक्की कोणत्या केंद्रावर परीक्षा द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गट ड संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालयातील 42 संवर्गातील 78 कार्यालयातील 3462 पदे भरण्यासाठी येत्या रविवारी, 31 ऑक्टोबर रोजी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता 4 लाख 61 हजार 497 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्वांची 1 हजार 364 केंद्रांवर परीक्षा आयोजन करण्यात आले आहे.
* परीक्षा एक दिवस आधी रद्द करण्याची नामुष्की
यापूर्वी आरोग्य विभागाच्या गट क पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. सुरुवातील परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा एक दिवस आधी रद्द करण्याची नामुष्की ठाकरे सरकारवर आली होती. त्यानंतर पुढे ढकलेल्या परीक्षेच्या हॉलतिकिटांमध्ये गोंधळ होऊन विद्यार्थ्यांना प्राधान्यानुसार परीक्षा केंद्रे देण्यात आली नव्हती. अखेर परीक्षेच्या दिवशीही काही परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका उशिरा पोहचल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या.