सोलापूर : सोलापुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये सात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश करुन लाखो रुपयांवर डल्ला मारला.
अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे.सोलापूर जिल्ह्यात सांगोल्याजवळ असलेल्या वाकी शिवणे गावातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये सात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या घटनेनंतर सांगोला तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली. याची माहिती सांगोला पोलिसांना देण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बँकेतील लॉकर ही गॅस कटरच्या सहाय्याने कट केले. लॉकरमध्ये ठेवलेली सात लाख रुपयांची रोकड चोरट्याने पळवून नेली. शिवाय बँकेतील महत्त्वाची कागदपत्रं आणि दस्त ऐवजही चोरट्यांनी जाळून टाकले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता बँकेतील कागदपत्रे बाहेर आणून जाळून टाकली. चोरट्यांनी रोखरक्कमेवर डल्ला मारल्यानंतर कागदपत्रे, दस्त का जाळले, याबाबत गावात चर्चा होत होती. यापूर्वी अशाच प्रकारे या बँकेत चोरी करून चोरट्यांनी रोकड लंपास केली होती, त्या घटनेचा अद्याप तपास लागला नसताना पुन्हा बँकेत चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. पहिल्या चोरीचा तपास न लागल्यानेच चोरट्याचे धाडस वाढल्याचे गावक-यांकडून सांगितले जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश्री पाटील, सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदींसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. चोरट्यांच्या तपासासाठी सोलापूर येथून श्वानपथक मागवले आहे. सध्या पोलिस घटनास्थळी ठाण मांडून तपास करीत आहेत.
* मोडनिंब येथे पादचारी वृद्ध ठार
मोडनिंब (ता.माढा) येथील सुर्वे वस्तीजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने सदाशिव सखाराम मुळीक (वय ९३ रा. मोडनिंब) हे पादचारी वृद्ध जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद मयत सदाशिव यांचा मुलगा सुरेश मुळीक (वय ६४) यांनी टेंभुर्णी पोलिसात दाखल केली. पोलिसांनी अनोळखी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार तांबोळी पुढील तपास करीत आहेत.