सोलापूर – निराधार असलेल्या एका 77 वर्षीय वृद्ध मातेच्या नावावर असलेली घर जागा विकून त्यांचा सांभाळ न करता त्यांना घरातून हाकलून दिल्याप्रकरणी त्यांच्या दोन्ही मुलांविरूध्द विरुद्ध सदर बाजारच्या पोलिसांनी मारहाण, ज्येष्ठ नागरिक आणि पालण पोषण व कल्याण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात रमाबाई सिद्राम मंजुळे (वय 77 रा. तक्षशिल नगर, कुमठा नाका. सध्या रा. इंदापूर जि.पुणे) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी त्यांची दोन्ही मुले भोजप्पा आणि नामदेव सिद्धाराम मंजुळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्या दोन्ही मुलांनी आईच्या नावावर होटगी (ता.दक्षिण सोलापूर) येथे असलेली घरजागा परस्पर विकली. त्यानंतर त्या कुमठा नाका आणि शास्त्रीनगर येथे स्वतःच्या घरात राहण्यास गेल्या. तेव्हा दोन्ही मुलांनी त्यांना 2018 ते 2019 पासून सांभाळ न करता घरातून हाकलून दिले.
त्यांना संजय गांधी निराधार योजनेतून मासिक पेन्शन मिळत होती. ती पेन्शन देखील भोजप्पा मंजुळे हा काढून घेत होता. त्यांच्या कुमठा नाका किंवा शास्त्रीनगर येथील घरात त्या गेल्या असता दोन्ही मुलांनी त्यांना मारहाण करून हाकलून देत असत. त्यामुळे त्या इंदापूर येथील नातेवाईकाकडे राहण्यास गेल्या. तेथे राहत असताना त्यांचा मुलगा त्यांना तर दोन- तीन महिन्यानंतर सोलापुरात आणून त्यांच्या नावावरील पेन्शन काढून घेऊन परत गावाकडे पाठवित होता. अशी फिर्याद त्यांनी पोलिसात दाखल केली. हवालदार समीर मुजावर पुढील तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मद्यधुंद युवकांची बसवर दगडफेक, चालक – वाहकाला मारहाण
बार्शी : बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर खांडवीच्या पुढे असलेल्या पराग हॉटेल जवळ तीन मद्यधुंद युवकांनी विनाकारण एसटी बसवर समोरुन दगडफेक करुन काच फोडून चालक-वाहकाला मारहाण केली. आकस्मिकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे चालक गोंधळून गेले मात्र त्यांनी प्रयत्नपूर्वक बसवर नियंत्रण राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
यावेळी बसमध्ये 28 प्रवाशी होते. या हल्ल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याबाबत चालक रामु हरीभाऊ कोवे (रा. एस.टी. कॉलनी, अकलूज ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लक्ष्मण नवनाथ शिंदे (रा. एस.टी.स्टँडसमोर, कुर्डूवाडी ता.माढा) अभिषेक दिलीप गवळी (रा. खाडे एंटर प्राईजेस समोर, राधा कृष्णा नगर, कुर्डूवाडी ता.माढा),सिध्दार्थ विजय चव्हाण (रा. वागळे हस्पीटल समोर, कुर्डूवाडी ता. माढा) यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अकलूज आगाराची लातूर-अकलूज ही एसटी बस बार्शीमार्गे कुर्डूवाडी ला निघाली होती. ती खांडवीच्या पुढे असलेल्या पराग हॉटेल परमिट रुमजवळ आली असता तेथे उभ्या असलेल्या आरोपींपैकी एकाने बसच्या काचेवर दगड फेकून मारला आणि ते हॉटेल समोर आपली मोटरसायकल लावून आतमध्ये पळून गेले. या दगडफेकीत बसची समोरील काच फुटल्यामुळे चालक रामू कोवे यांनी तत्काळ बस थांबविली आणि खाली उतरून पराग हॉटेलमध्ये जावून आरोपीच्या मोटरसायकलचा आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढला.
यावेळी दगडफेक करणा-यांचे फोटो ते काढू लागल्याने त्यांनी तुम्ही फोटो का काढला? असे म्हणून त्यांना मारहाण केली. यावेळी वाहक गारडे हे सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील त्यांनी मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवाशांनी खाली उतरून चालक – वाहकांची सोडवणूक केली. या हल्ल्यात बसची काच फुटून 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.