पंढरपूर : संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाचे लांबी अनुक्रमे 231 व 130 किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण 12 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तरी या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
पंढरपूर पालखी मार्ग आणि पंढरपूरला जोडणाऱ्या रस्तेमार्गांच्या कामाची माहिती देताना वारकरी, वारी, माऊली, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि पंढरपूर याबद्दल मोदी भरभरुन बोलले. याच कार्यक्रमात इतरही नेत्यांची भााषणे झाली. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात एक जुगलबंदी दिसून आली.
प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकूण 13 महामार्ग प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आभासी प्रणालीद्वारे कळ दाबून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्पूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाच्या प्रतिकृतीची पाहणी करून याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर या महामार्गाच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा यांच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे प्रमुख योगेश देसाई व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे प्रमुख मोरे यांचा सत्कार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
या 13 महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर , आमदार प्रशांत परिचारक, बबनराव शिंदे, चंद्रकांत पाटील, समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील,केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचे सचिव गंगाधर अरमाने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अन्यमान्यवर तसेच संत मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुन जुगलबंदी पाहायला मिळाली. अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मान्यवर आणि उपस्थित वारकरी संपद्राय असे म्हणत भाषणाला सुरूवात केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायचं आपण विसरलो हे लक्षात येताच, उद्धव ठाकरे यांनी ती बाजू कव्हर केली. देवेंद्रजी सॉरी, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आमचे सहकारी देवेंद्रजी… असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी… असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री यांची नावे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेताना खास उल्लेख केला. माझे मित्र आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस… असे मोदींनी म्हटले. मोदींनी आपल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस हे माझ्या किती जवळचे आहेत, हेच दाखवून दिलंय. कारण, इतरांची नावे घेताना मोदींनी केवळ पदाचा उल्लेख केला. पण, देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेताना मोदींनी ‘मित्र’ असे मुद्दामहून संबोधत एकप्रकारे उद्धव ठाकरेंना चिमटाही काढला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, या पालखी महामार्गामुळे या भागातील विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशी ही चांगला संपर्क निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवले जाणार असून या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण केल्या जाव्यात. पंढरपूरची वारी जगातील सर्वात प्राचीन वारी असून या ठिकाणी भरणारी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा आहे. शेकडो वर्षाची गुलामी, नैसर्गिक आपत्तीमध्ये ही वारी सुरूच असून या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव व द्वेष केला जात नसून ही जगाला समानतेचा संदेश देणारी वारी असून या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा समान असतो असे त्यांनी सांगितले.
वारकरी एकमेकांना माऊली नावानं हाक मारतात. माऊलीचा अर्थ ‘आई’ म्हणजे मातृशक्तीचं हे कौतुक आहे. महाराष्ट्राच्या भूमीने अनेक वीर दिले. पंढरपूरने मानवतेला केवळ भक्ती नव्हे तर देशभक्तीचा मार्गही दाखवला. विठ्ठलाचं दर्शन हे वारकऱ्यांसाठी ध्येय असतं. विठुमाऊलीच्या दर्शनानं डोळ्याचे पारणे फिटतात. युगे युगे भक्ताच्या आग्रहास्तव पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. पालखी मार्गाचं भूमिपूजन करताना मला खूप आनंद होतोय असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास शक्य आहे. त्यासाठी पंढरपुरात मास्टन प्लॅन राबविण्यात यावा, मंदिर परिसरातील नागरिकांची जागा ताब्यात घ्या, त्यांना योग्य मोबदला देऊन मंदिराकडे जाणारे रस्ते मोठे व्हावेत यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या.
आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या रस्ते कामांचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नितीन गडकरी बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, पालखी मार्गामुळे पंढरपूरचा विकास आता यापुढे वेगाने होणार आहे. या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार असल्याने धार्मिक पर्यटन वाढीसाठी हे रस्ते अत्यंत योग्य ठरणार आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.
पालखी मार्गावरून चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर गवत व स्टाईलस बसविण्यात येणार आहेत, शिवाय प्रकल्पात समावेश नसलेला वाखरी ते पंढरपूर या रस्त्यासाठी ७४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या मार्गावरील रेल्वे पुलाची सुधारणाही होणार असल्याचे गडकरी यांनी आवर्जून सांगितले.