नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रंगला. या सामन्यात भारत पराभूत झाल्यानंतर आता पुन्हा सामना होवून भारताने पाकिस्तानला जोरदार धोबीपछाड द्यावे, अशी भारतीय क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. तीच इच्छा आता पूर्ण होऊ शकते. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला संघाचा पाकिस्तानशी सामना होणार आहे.
बर्मिंघममध्ये २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. यामध्ये महिला टी-२० क्रिकेटचे सामने पाहायला मिळणार आहे. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना ३१ जुलैला पाकिस्तानच्या महिला संघासोबत होणार आहे. त्याआधी २९ जुलैला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. तर ३ ऑगस्टला भारताची मॅच बारबाडोसविरुद्ध आहे.
२०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यात होणाऱ्या महिला टी-२० क्रिकेट संघांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पुढील वर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे महिला क्रिकेट संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.
राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे. इ.स. १९३० सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी भरवले जातात. सुरुवातीस ‘ब्रिटिश साम्राज्य मधील खेळ’ त्यानंतर इ.स. १९५४ पासून ‘ब्रिटिश एम्पायर खेळ ‘ व इ.स. १९७० पासून ‘ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ ‘ या नावांनी ही स्पर्धा ओळखली जात असे. १९७८ साली ‘राष्ट्रकुल खेळ’ हे नाव या स्पर्धेला दिले गेले. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ही लंडन येथे मुख्यालय असलेली संस्था असून राष्ट्रकुल खेळांत अनेक ऑलिंपिक खेळ तसेच इतर काही विशेष खेळ घेतले जातात.
राष्ट्रकुल परिषदेचे ५४ सदस्य असले तरीही राष्ट्रकुल खेळांमध्ये ७१ देश भाग घेतात. अनेक घटक देश वेगवेगळे संघ पाठवतात. राष्ट्रकुल स्पर्धेत १९९८ मध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण नंतर ते बाहेर पडले. आता पुन्हा एकदा क्रिकेटने या स्पर्धेत प्रवेश केला आहे. मात्र यावेळी टी-२० महिला क्रिकेटला स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
१९९८ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या स्पर्धेत पुरुषांचे क्रिकेट होते. त्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. दरम्यान, लुईस मार्टिन म्हणाल्या की, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हा ऐतिहासिक दिवस असणार आहे. या स्पर्धेत आम्ही क्रिकेटचे पुन्हा स्वागत करत आहोत. महिला क्रिकेटसाठी हा अविस्मरणीय दिवस आहे.
क्रिकेटला समाविष्ट करण्यासाठी जे जागतिक स्तरावर प्रयत्न झाले, त्याला यश बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स आयोजन समितीने शुक्रवारी क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार, राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये महिला क्रिकेटमधील भारतीय महिला संघ २९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा महिला संघ ३१ जुलैला आमनेसामने येणार आहे. सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळवले जातील.
भारत आणि पाकिस्तान या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. कांस्यपदक आणि सुवर्णपदकांचे सामने ७ ऑगस्ट रोजी होणार आहेत. त्याचवेळी उपांत्य फेरीचे सामने ६ ऑगस्टला होणार आहेत. यजमान इंग्लंड ३० जुलै रोजी पात्रता फेरीतील पहिला सामना खेळणार आहे. स्पर्धेतील आठ संघांना प्रत्येकी चारच्या दोन गटात विभागण्यात आले असून, भारताला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोससह अ गटात स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि एक पात्रता संघ असेल, भारताचा शेवटचा गट सामना ३ ऑगस्टला बार्बाडोसविरुद्ध होणार आहे.