नागपूर : ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेचा बदला घेण्याबाबतचा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज नागपूर येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय, मात्र त्यांचा त्रासाचा एक एक मिनिट वसूल करेल, ते पुन्हा सक्रिय होतील. त्यांची वस्तुस्थिती मला माहित आहे. अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला सक्षमपणे हाताळले, असेही शरद पवार म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्यावरूनही पवार यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.
अनिल देशमुख यांना तुम्ही तुरुंगात टाकलं आहे पण त्यांच्या तुरुंगातील प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची किंमत जनता तुमच्याकडून वसूल करणार आहे’, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपला दिला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अटक आणि भाजपचं राजकारण यावर त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं व भाजपला थेट शब्दांत इशारा दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरून अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख यांना अटक दाखवण्यात आली आहे. देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
शरद पवार म्हणाले, ‘मी नागपुरात आलो आहे आणि अनिल देशमुख येथे नाहीत, असं प्रथमच घडलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्याने भाजपची मंडळी अस्वस्थ झाली असून सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या मागे वेगवेगळ्या एजन्सीज लावण्यात आल्या आहेत. देशमुख यांची अटकही त्यातूनच झाली असून देशमुखांना तुम्ही तुरुंगात टाकलं असलं तरी तुरुंगातील त्यांच्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची किंमत जनता तुमच्याकडून वसूल करणार असल्याचे ठणकावून सांगितले.
एखाद्या राज्यात सत्ता न मिळाल्यास केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला. प्रफुल्ल पटेल यांनीही यावेळी महत्त्वाचे विधान केले. शरद पवार यांचे आशीर्वाद अनिल देशमुख यांच्यासोबत आहेत आणि पवारांच्या आशीर्वादाने देशमुख लवकरच तुरुगांबाहेर येतील, असे पटेल म्हणाले. हे माझे मत नाही तर शरद पवार यांचे मत असल्याचेही त्यांनी आवर्जून पुढे सांगितले. यावर अनिल देशमुख या प्रकरणात एकाकी नसून राष्ट्रवादी सोबत असल्याचे या विधानावरुन दिसून आले.