सोलापूर : पॉलिश करण्यासाठी दिलेले ७ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन कामगार पसार झाला. ही घटना पंढरपूर येथील समर्थ अलंकार या दुकानात घडली. या प्रकरणात पंढरपूर शहर पोलिसांनी पश्चिम बंगालच्या एका कामगारा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.
पंढरपूर येथील महेश तानाजी करंडे या सराफ व्यापाऱ्यांनी रहीम सय्यद शेख (वय ३० रा. टाकळीरोड पंढरपूर, मूळ रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) या कामगाराला नेहमीप्रमाणे १९३ ग्रॅम सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी २६ जूनला दिले होते. त्यानंतर तो टाळाटाळ करीत पंढरपूर सोडून गायब झाला. आपली फसवणूक झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर महेश कारंडे यांनी पंढरपूर शहर पोलीसात फिर्याद दाखल केली. सहाय्यक निरीक्षक निलेश बागाव पुढील तपास करीत आहेत.
* कुरोली येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने ट्रक चालक ठार
कुरोली (ता.पंढरपूर) येथील पेट्रोल पंपाजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने बापूराव संपत केसकर (वय ३६ रा. केसकरवाडी ता.पंढरपूर) हे ट्रक चालक गंभीर जखमी होऊन मरण पावले हा. अपघात काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडला. बापूराव हे पंपावर ट्रक उभा करून लघुशंकेसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी पंढरपूर ते पुणे मार्गावरील अनोळखी वाहनाच्या धडकेने ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. या अपघाताची नोंद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली. फौजदार शिंदे पुढील तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* जुना तुळजापूर नाका येथे टेम्पोच्या धडकेने पादचारी वृद्ध ठार
सोलापूर – शहरातील जुना तुळजापूर नाक्याजवळ वेगाने जाणाऱ्या टेम्पोच्या धडकेने अरुण दिगंबर शेनमारे (वय ७० रा. पिंपळा ता. तुळजापूर) हे पादचारी वृद्ध गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास घडला.
अरुण शेनमारे हे फुलाचा व्यवसाय करतात. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास ते खाजगी वाहनातून तुळजापूर नाका येथे उतरले होते. त्यानंतर ते पायी मार्केट यार्डच्या दिशेने निघाले होते. तेव्हा पाठीमागून एमएच १६- -सीसी- ६७०६ या क्रमांकाचा आयशर टेम्पो धडकल्याने गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाले. या अपघाताची नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली. पोलीसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.