कोल्हापूर : विधान परिषदेच्या जागेवर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विशेष बाब म्हणजे अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्लीवरुन फोन आल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांची घोषणा झाली. काँग्रसनेही उमदेवारांच्या नावाची घोषणा केली. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. कोल्हापूर आणि नागपूरची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार नागपूर हे भाजपच्या ताब्यात असेल, तर कोल्हापूर काँग्रेसच्या ताब्यात जाईल, अशी राजकीय खेळी होती. आता या खेळीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
विशेष म्हणजे अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्लीवरुन फोन आल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचे वृत्त आहे. ‘राज्यात गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणत्याही निवडणुका होऊ शकल्या नव्हता. पुढे जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सलोखा रहावा. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा झाल्याचेही वृत्त आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भाजपसाठी मुंबईची जागा महत्वाची आहे, ती बिनविरोध झाली आहे. त्या बदल्यात कोल्हापूर करावी अशी वरिष्ठांची मागणी होती. तसंच धुळे-नंदुरबारची जागाही आम्हाला मिळाली पाहिजे, ही भूमिका भाजप नेत्यांनी आग्रही ठेवल्यामुळे तिथे अमरिश पटेल यांचीही निवड बिनविरोध करायची, म्हणजे दोन भाजपच्या जागा. एक सीट जास्तीची पदरात पडली. भाजपच्या दोन जागा त्या बदल्यात कोल्हापूरची एक जागा त्यांना द्यावी असा पक्षादेश आला होता.
‘दीड वाजता देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला आणि त्यांनी अशा घडामोडी झाल्या असल्याची माहिती दिली. या विभागात आम्ही भाजप आणि मित्रपक्ष यांच्यावतीनं अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. शौमिका अमल महाडिक यांचाही उमेदवारी अर्ज भरला होता. हे दोन्ही अर्ज आम्ही मागे घेतले आहेत. सदस्यसंख्या आमच्याकडे चांगली झालेली होती. पण पक्षादेशामुळे आम्ही याठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली.
“मी भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाने आदेश दिला की निवडणूक लढ, मी तयार झालो. त्याच पद्धतीने आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांचा, तसंच पक्षाचा आदेश मान्य करुन माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे”
अमल महाडिक – भाजपचे उमेदवार