सोलापूर : सभागृहात संतापलेले सुरेश पाटील यांनी भर सभागृहात नगरसचिवांना पाण्याची बाटली फेकून मारली. सर्वसाधारण सभेत हा धक्कादायक प्रकार घडला. सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी हे कृत्य केलं आहे. पाटील यांना रस्त्याच्या संबंधित विषयावर बोलायचे होते. मात्र महापौरांनी विषय संपला असल्याचे सांगत परवानगी नाकारली. पण हा सर्व प्रकार का घडला, याचीच चर्चा होत आहे.
नगरसचिव दंतकाळे यांना सुरेश पाटील अनेक वेळा अजेंड्यावरील किती विषय परत गेले आहेत. सभागृहाचे इतिवृत्तात नगरसेवकांना दिले नाही? तसेच अनेक प्रकरणाची कागदपत्रांची मागणी नगरसचिव कार्यालयाकडे केली होती. मात्र नगरसचिवांनी दिली नाही. त्यामुळे नगरसचिवांच्या दालनात सुरेश पाटील यांनी अनेक वेळा आंदोलन देखील केले होते. दंतकाळे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव देखील सभागृहात दाखल केला होता. सेवानिवृत्त झाल्यानंतर सहा महिन्याची मुदत वाढ देण्यावरून सुरेश पाटील नाराज होते. त्याचा वचपा पाटील यांनी सभागृहात काढल्याची चर्चा पालिकेच्या आवारात होती.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज बेकायदा चालले आहे. नगरसचिव बेकायदेशीर कामकाजाला प्राधान्य देत आहेत. दलित वस्ती योजने अंतर्गत निधी प्राप्त नसताना कोट्यवधींच्या विषयाला मान्यता देण्याचा सपाटा लावला आहे. यावर भाष्य करण्यास महापौरांनी मज्जाव केल्याने नगरसेवक सुरेश पाटील यांनी आज संविधान दिन आहे, सभाशास्त्र पाळा म्हणत संतप्त झाले. यातूनच नगरसचिवांवर बाटली फेकून मारली आणि माईक तोडला. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. महापौरांनी तुम्हाला निलंबित केले आहे. तुम्ही बाहेर जा असे पाटील यांना सांगितल्याने सुरेश पाटील पुन्हा आक्रमक झाले. भाजपच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाचा आवाज दाबत आहात, हे तुम्हाला शोभते का ? म्हणताच महापौरांनी आयुक्तांना सांगून पोलिसांना बोलावून घेतले. मात्र सर्व गटनेत्यांनी सुरेश पाटील यांची मनधरणी करत शांत केले. त्यामुळे महापौरांनी पोलिसांना बाहेर जाण्यास सांगितल्याने या वादावर पडदा पडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी आणि सुरेश पाटील यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. पाटील सभागृहात अनेक विषयांना विरोध करत सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना अडचणीत आण्याचे काम करतात. त्यामुळे पाटील आणि पदाधिकारी असा वाद पालिकेत निर्माण झाला आहे. अनेक टेंडर तीस टक्के, चाळीस टक्के कमी दराने दिले जात आहेत. यामध्ये मिळणाऱ्या टक्केवारीसाठी हा वाद असल्याने सभागृहात हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.
मागील वीस वर्षांपासून मी नगरसेवक म्हणून पालिकेच्या सभागृहात उपस्थित राहून कामकाजात सहभाग घेत आहे मी बाटली महापौरांच्या दिशेने फेकलं नाही असं म्हणत भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी सभागृहात घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे.
सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच महापौरांनी रोलिंग दिल्याप्रमाणे नगरसचिव रवींद्र दंतकाळे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यास सुरुवात केली. दरम्यान विषय पत्रिका वाचून झाल्यानंतर महापौरांनी रोलिंग दिल्यानंतर सुरेश पाटील यांनी संबंधित विषयावर बोलण्याचा हट्ट धरून बसले, मला बोलायच असताना आपण रोलिंग का दिला आज संविधान दिन आहे. आज तरी कमीत कमी घटनात्मक पद्धतीने पालिकेच्या सभागृहाचे कामकाज चालू द्या, असं म्हणून सुरेश पाटील यांनी आपल्या हातातील पाण्याची बाटली महापौर आणि नगरसचिवाच्या दिशेने फेकली. सुरेश पाटील यांचे कृत्य हे निंदनीय आणि सभागृहाच्या संकेतला सोडून असल्याचे लक्षात येताच महापौरांनी पालिका आयुक्तांना पोलिसांना आदेश देऊन सुरेश पाटलांना बाहेर काढण्याचे आदेश दिले.
* सभेचे काम बेकायदा
माझ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांना बोलावण्याचा अधिकार महापौरांना आहे. मात्र पालिका आयुक्तांनी पोलिसांना बेकायदा आदेश देऊन बोलावले यांचा निषेध आहे. माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही. झाली असती तर बाहेर गेलो असतो. सभेचे काम बेकायदा चालू असल्याने आपण विरोध केला.
– सुरेश पाटील , ज्येष्ठ नगरसेवक