पंढरपूर : पाच लाख मुद्दलापोटी मनमानी करून बेकायदेशीरपणे व्याजावर व्याज लावून २० लाखाची मागणी करणा-या पंढरपूरच्या सावकाराला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
५ लाख ४५ हजार मुद्दलासह व्याजाचे पैसे परत देऊनसुद्धा सावकाराकडून संजय लेंगरे यांच्याकडे २० लाखांसाठी तगादा लावण्यात येत होता. पैसे परत न मिळाल्यास गहाण म्हणून सावकाराच्या नावावर केलीली जमीन विकून टाकणार असल्याचे सांगितल्याने सतीश तानाजी घंटे व याच्याविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सतिश तानाजी घंटे (रा. ईसबावी), कृष्णा आगतराव सुरवसे (रा. वाखरी ) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पो. नि. धनंजय जाधव यांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाखरी (ता.पंढरपुर) येथे संजय लेंगरे हे राहण्यास असून त्यांना वाखरी येथे वडीलोपार्जीत शेती आहे. सन 2016 साली संजय लेंगरे यांनी इसबावी पंढरपूर येथील सतिश तानाजी घंटे यांचेकडुन 5 लाख 45,000 रुपये रक्कम घेतली होती. त्याबदल्यात त्यांनी सतिश तानाजी घंटे यांना एक एकर वडीलोपार्जीत जमिनिपैकी 20 गुंठे जमीन लिहून दिली होती. त्यावेळी सदर रक्कम परत केल्यानंतर जमिन परत देण्याचे ठरले होते.
त्याप्रमाणे संजय लेंगरे यांनी 23 जुलै 2018 रोजी सतिश तानाजी घंटे यांना 2 लाख रुपये परत केले होते. उर्वरीत रक्कम देखील परत करुनही जमिन संजय लेंगरे यांच्या नावावर केली नाही. सतिश तानाजी घंटे यांनी संजय लेंगरे यांना तुमची मुद्दल व व्याज मिळुन वीस लाख रुपये होतात, असे सांगीतले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संजय लेंगरे यांनी 7 लाख रुपये घे परंतू आमची जमिन आम्हाला परत दे असे सांगीतले. परंतू त्याने त्यास नकार दिला व वीस लाख रुपयांची मागणी करु लागला. परंतु त्यावेळी सतिश घंटे याने घरी येवुन माझ्या विरुध्द तक्रार देवू नका तुमची जमिन मी तुम्हाला परत देतो, असे बोलला होता. त्याप्रमामे वचनचिठ्ठी देखील लिहून दिली.
काही दिवसानंतर संजय लेंगरे यांनी सतिश घंटे याला त्याला त्याची रक्कम परत करण्याची तयारी दाखवून व जमीन पुन्हा नावावर करुन देण्यास सांगितले. परंतु पुन्हा त्याने आपला शब्द फिरवुन नियमाप्रमाणे मुद्दल व व्याज मिळुन अशी वीस लाख रुपये दिल्याशिवाय जमिन देणार नाही, असे सांगीतले.
त्याला वारंवार ठरल्याप्रमाणे पैसे घे व आमची जमीन आम्हाला परत दे असे सांगितले. परंतु त्याने पैसे परत न मिळाल्यास मी जमीन दुस-याला विकून टाकतो, म्हणाला. जमीन हडपण्याचा डाव ओळखून संजय लेंगरे यांची पत्नी वैशाली संजय लेंगरे यांनी सतिश तानाजी घंटे याच्याविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीवरून महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपी सतिश तानाजी घंटे, कृष्णा आगतराव सुरवसे या दोघांना अटक केली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोनि धनंजय जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार हे करीत आहेत.