कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 2019 विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता.
सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोल्हापुरातील फुटबॉल आणखी वाढावा यासाठी त्यांचा प्रयत्न होता. कोल्हापुरातील पेठांमध्ये चंद्रकांत जाधव अण्णा यांचा घराघरांत वावर असायचा. कोल्हापुरातील तालमी, कोल्हापुरातील सामाजिक संघटना यांना चंद्रकांत जाधव यांनी भरघोस मदत केली. आज जाधवआण्णा त्यांच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी एक वाजेपर्यंत चंद्रकांत जाधव याचे पार्थिव कोल्हापुरात आणले जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जाधव आण्णांची ओळख उद्योगपती अशी होती. चंद्रकांत जाधव यांचे जाधव इंडस्ट्रिज, प्रेमला पिक्चर्स, जाधव टूल्स, जाधव बेवरेजेस, जाधव मेटल्स, प्रेमला इंडस्ट्रिज असे उद्योग आहेत. उद्योग क्षेत्रात त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला होता. पूर्वाश्रमीचे फुटबॉल खेळाडू, फुटबॉलखेळाचा पाठीराखा म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख होती.
निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबादमध्ये उपचार सुरू होते.
आमदार चंद्रकांत जाधव यांना दीड वर्षात दोन वेळा कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. मध्यंतरी प्रकृती ठणठणीत झाल्याने ते पुन्हा आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय झाले होते. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू त्यांना हैदराबादमध्ये दाखल केले होते.