मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यातच आज एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये वेतनवाढीचा दर 3 टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कामावर हजर असलेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना 10 डिसेंबरपर्यंत वेतन दिले जाणार आहे. या परिपत्रकानुसार नवीन व 10 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार 5 हजार रुपयांनी वाढणार आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी या वेतनवाढीची घोषणा केली होती. मात्र, राज्यातील अनेक आगारातील एसटी कर्मचारी आणि अधिकारी संपावर ठाम आहेत. त्यातच हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार नवनियुक्त आणि 10 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार 5 हजारांनी वाढणार आहे. 10 ते 20 वर्षांचे सेवा झालेल्यांचा पगार 4 हजारांनी आणि 20 वर्षांपुढील सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार हा फक्त 2500 रुपयांना वाढणार आहे.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता दिला जातो. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगारवाढ केली जावी, ही बाब देखील मान्य झाली आहे. या बाबी करारामध्ये होत्या. पण बेसिकचा विषय होता. म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की जे कर्मचारी 1 ते 10 वर्ष या श्रेणीत आहेत, या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक 5 हजारांची वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्य सरकारने पगारवाढ करूनही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. मात्र, आता या प्रश्नी तोडगा कधी आणि कसा निघणार, असा प्रश्न कायम आहे. कारण विलीनीकरणाचा निर्णय इतक्या सहजासहजी शक्य नाही. राज्य सरकारही त्याला तयार नाही. त्यामुळे कोणीतरी माघारीची भूमिका घेण्याची गरज आहे. संपामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
गेल्या 22 दिवासांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कामगार अडून बसले आहेत. तर दुसरीकडे सरकारनेही निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत 8195 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर, 1827 लोकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातून कर्मचारी आझाद मैदानात आले आहेत. जोपर्यंत विलणीकरण होत नाही तो पर्यंत जाणार नाही या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. आज मुंबईत पाऊस पडत आहे तरी एसटी कामाचारी निर्णयावर ठाम असून मैदानात ठाण मांडून आहेत. ऊन असो की पाऊस. कितीही मोठे तुफान आले तरी जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एसटी संपावरून राज्य सरकारवर निशाणा साधून घरचा आहेर दिलाय. मंत्र्याच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार चुकीचचं असल्याचे मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलंय. जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो. त्याला फक्त 12 हजार रुपये पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे,’ असा घणाघात त्यांनी केला आहे. पुढे त्यांनी आम्ही त्यांच्या बाजूने आहोत, असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला आहे.