नवी दिल्ली / वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंताजनक घोषित केलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन 24 देशात पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बोत्सवाना, ब्राझील, कॅनडा, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, इस्राईल, इटली, जपान, नेदरलँड्स, नायजेरिया, नार्व्हे, पोर्तुगाल, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, युके, अमेरिका या देशात ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळले आहे.
कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटमुळे ओमिक्रॉनचा धोका वाढतच चालला आहे. तब्बल 24 देशांमध्ये ओमिक्रॉनने आता हातपाय पसरले आहेत.
दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एका व्यक्तीमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं दिसून आली आहेत. अमेरिकेत आढळलेला ओमिक्रॉन व्हेरियंटचा हा पहिलाच रुग्ण आहे. तर अमेरिकेमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर व्हाईट हाऊसने अमेरिकन नागरिकांना कोरोना लस आणि बूस्टर डोस घेण्याची विनंती केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. एंथनी फौची यांनी सांगितलंय की, दक्षिण आफ्रिकेतून कॅलिफोर्नियामध्ये परतलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संक्रमण आढळून आलं आहे. या व्यक्तींचं संपूर्ण लसीकरण झालेलं होतं. मात्र, तरीही त्याला सौम्य स्वरुपाची लक्षण दिसून येत होती. मात्र, आता त्यात हळूहळू सुधारणा होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* कोणत्या देशांमध्ये आढळले ओमिक्रॉन बाधित?
बोत्सवानामध्ये 19, दक्षिण आफ्रिका 77, नायजेरियामध्ये 3, यूकेमध्ये 22, दक्षिण कोरिया 5, ऑस्ट्रेलिया 7, ऑस्ट्रिया 1, बेल्जियम 1, ब्राझील 3, चेक रिपब्लिकमध्ये 1, फ्रान्स 1, जर्मनी 9, हाँगकाँग 4, इस्रायल 4, इटली 9, जपान 2, नेदरलँड 16, नॉर्वेमध्ये 2, स्पेन 2, पोर्तुगाल 13, स्वीडन 3, कॅनडा 6, डेन्मार्क 4, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रत्येकी एक ओमिक्रॉन बाधित आढळले आले आहेत.
* दिलासादायक : भारतात शिरकाव नाही
जगभरातील 25 देशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे, अद्याप भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नाही.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 9765 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकूण 477 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 69 हजार 724 वर पोहोचला आहे.