सोलापूर – श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने कोजनरेशन चिमणी उभारताना प्रदूषण नियंत्रण मंडळाची पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नसल्याचे राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांनी कारखान्याला 96 तासांची मुदत देत कारखाना बंद करण्याचे पत्र पाठवले होते तर दुसरीकडे महावितरण व जलसंपदा विभागाला पत्र पाठवून 96 तासाची मुदत देऊन पाणी व वीज बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत आज संपणार आहे. जलसंपदा विभागाने पाणी बंद केल्याने महावितरणच्या अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी ही कारखान्यावर जाऊन कनेक्शन तोडण्याच्या दृष्टीने पाहणी केली आहे.
कारखान्याच्या गाळप हंगाम सध्या सुरू आहे. महापालिकेने सुरू केलेल्या चिमणी पाडकाम पथकाची कारवाई थांबवावी यासाठी सिद्धेश्वर कारखान्याने 30 ऑक्टोंबर तर नोव्हेंबर महिन्यात दुसरी याचिका उच्च न्यायालयात दाखल केले होती. याचिका वेगवेगळ्या न्यायमूर्तीकडे असल्याने त्या एकत्रित करून त्यावर सुनावणी व्हावी अशी मागणी कारखान्याच्या वकिलांनी केली होती. त्यावेळी महापालिकेच्या वकिलांनी ही चिमणी कामासाठी किमान दोन आठवड्यांची वेळ लागेल असं स्पष्ट केलं होतं.त्यावर आता पुढील आठवड्यात सुनावणी होईल.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशी नंतर नवा पेच कारखान्यासमोर निर्माण झाला आहे. चिमणी पाडकामापूर्वी ती थंड होऊ द्यावी लागणार आहे. तसेच कोजनरेशन चिमणी उभारताना पर्यावरण विभागाची परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवून कारखान्याची वीज कनेक्शन व पाणी बंद करण्याची कारवाई केली जात आहे.
वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करताना महावितरणने पोलिस बंदोबस्त मागवला होता. चार वाजता महावितरण वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी कारखाना कर्मचाऱ्यांनी सभासदांनी एकच गोंधळ केला आणि वीज तोडणीस हरकत नोंदवली. यावेळी एक व्यक्ती वीज टॉवरवर चढला आणि खाली उडी मारण्याची धमकी दिली.या सर्व बाबींचा विचार करून महावितरणने वीज जोडणीसाठी आणखी आठ दिवसांची मुदत दिली आहे.
कुमठे (ता. उत्तर साेलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणीय नियमांचे वारंवार उल्लंघन हाेत आहे. पुढील चार दिवसांत कारखान्याचे गाळप व सहवीज निर्मिती प्रकल्प बंद करण्यात यावा, असे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी (पुणे) नितीन शिंदे यांनी कारखान्याला दिले आहेत. वीज वितरण कंपनी आणि पाटबंधारे विभागानेही कारखान्याचा वीज व पाणीपुरवठा बंद करावा असेही कळविले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यानुसार जलसंपदा विभागाने होटगी तलावातून कारखान्याला होणारा पाणी पुरवठा बंद करून पंप हाऊस सिल करून टाकले आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार महावितरणचे अधिकारी कारखान्याची वीज तोडण्यासाठी गेले होते. तेथील गोंधळामुळे वीजतोडणी तूर्तास टळली आहे.
* धर्मराज काडादी यांचा खोटेपणा आता चालणार नाही
सिध्देश्वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचा खोटेपणा आता चालणार नाही. ते सर्व ठिकाणी हरले आहेत, त्यामुळं अफवांचा आधार घेवून शेतकऱ्यांची आणि जनतेची दिशाभुल करीत आहेत, असा आरोप सोलापूर विचारमंचच्या पत्रकार परिषदेत केला.
न्यायालयाच्या आणि सरकारच्या आदेशाप्रमाणे काम झालं तर विमानतळाला अडथळा ठरणारी चिमणी नक्की पडणार असा दावाही करण्यात आला. तसेच त्याची कार्यवाही सुरु झाल्याचंही सांगण्यात आलं. काडादी यांनी कायदेशीर मार्गाने आमच्या विरुध्द लढावं, त्यांच्याशी आमचा वैयक्तीक कोणताही त्वेष नाही. ते मात्र आमच्या बद्दल अपशब्द काढत आहेत, आमच्या घरासमोर शेतकऱ्यांना उसाच्या गाड्या लावा, कारखाना बंद पडणार त्यास हीच मंडळी जबाबदार आहेत असं सांगत आहेत. मात्र काडादींच म्हणणं खोटं आहे, कारखान्याची चिमणी पाडली, तरी ती को जनरेशनची आहे, ती बेकायदा ठरली आहे. काही दिवस कारखाना कमी क्षमतेनं चालेल मात्र जुन्या चिमणीवर काम चालू शकेल असंही सांगण्यात आलं.
पत्रकार परिषदेत संजय थोबडे, डॉ. संदीप आडके, शिवानंद मेंगाणे, प्रसन्न नाझरे गणेश पेनगोंडा, विजय लिंगे आदी उपस्थित होते.
* धर्मराज काडादी काय म्हणतायत
सभासद शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरू नये, वीज किंवा पाणी बंद केले तरी कारखाना बंद पडणार नाही. आपण आपली स्वतःची वीज निर्माण करतो त्यावर आपण कारखाना चालू शकतो. मात्र, चिमणी पाडल्यास कारखाना बंद पडू शकतो. उलट आपली वीज न मिळाल्याने आपल्याप्रमाणेच वीज मंडळाचेही मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर उसातील पाणी आणि आपल्या विहिरीतील पाणी वापरून आपण हा गाळप हंगाम नक्कीच पूर्ण करू शकतो. तरी शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांमुळे विचलित न होता आपल्या कारखान्याला नोंदलेला ऊस पुरवठा करून हा गळीत हंगाम यशस्वी करावा. या गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्यात काढलेल्या उसाच्या मोबदल्यापैकी १८०० रुपये सोमवार, ६ डिसेंबरपासून दिले जाणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी माध्यमांना सांगितलंय. ते मुंबईत होते.
सहकारी साखर कारखान्याची चिमणी सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. सोलापुरातील काही राजकारणी मंडळी सोलापूर विकास मंचच्या कार्यकर्त्यांच्या आडून जे राजकारण करत आहेत, ते अतिशय घृणास्पद आहे, अशी टीका कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली.
थोबडे, आडके याच्यासह त विकास मंचच्या मंडळींना माझे सांगणे राहील की, सभासद, कामगार यांचा आक्रोश समजला असेल, त्यांनी आपली तोंडे बंद करावीत अन्यथा शेतकरी व कामगार एकदा पेटून उठला तर या मंडळींची पळता भुई थोडी होईल व त्यास मी जबाबदार राहणार नाही, असे काडादी यांनी स्पष्ट केले.