मुंबई : लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होत असल्याने चिंता व्यक्त होत असून बूस्टर डोससंबंधी चर्चा सुरु आहे. त्यातच यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली. ज्यांनी दोन डोस घेतले होते त्यांनाच याची बाधा झाल्याचं दिसत आहे. तर मग बूस्टर डोसची गरज आहे का? आज आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत. त्यासंबंधी देश पातळीवर निर्णय झाला पाहिजे असं वाटतं, असं पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली असून केंद्राला पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार चैत्यभूमीवर दाखल झाले होते.
बुस्टर डोसबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं लवकरात लवकर स्पष्ट करावा, बुस्टर डोस द्यायचा आहे, तर तो का द्यायचाय? आणि जर नाही द्यायचाय, तर का नाही द्यायचाय? याचं स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे. असंही अजित पवार म्हणाले. तसेच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) तातडीनं पावलं उचलली पाहिजे, असंही ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “बुस्टर डोससंबंधी जी चर्चा सुरु आहे त्याबद्दल वेगवेगळा मतप्रवाह आहे. तो द्यायचा की नाही याबद्दल काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. त्यासंबंधी तज्ज्ञ लोकच सांगू शकतात”.
अजित पवार म्हणाले की, “ओमायक्रॉनबाबत मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाचं बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांतही इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांबाबत केंद्र सरकारनंही कडक भूमिका घेणं गरजेचं आहे. जिथे-जिथे देशात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्या सर्व ठिकाणी नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतंय की, नाही? हे पाहणं गरजेचं आहे.”
दरम्यान यावेळी अजित पवारांनी राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने नव्याने नियमावली जाहीर होणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचं यावर बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत तिथे नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतं की नाही हेदेखील पाहिलं पाहिजे”.
“काल, परवा काही राजकीय लोकांच्या घरात लग्न झाली. तिथे प्रचंड गर्दी होती. हा विषाणू फार वेगाने पसरतो असं सांगितलं जात आहे. म्हणूनच देशपातळीवरुन सर्व राज्य, नागरिकांना यासंबंधीचं चित्र स्पष्ट करणं गरजेचं आहे”
अजित पवार – उपमुख्यमंत्री