बार्शी : बार्शीत राज्यातील पहिल्या मराठा मंदिर वास्तूचे भूमीपूजन आज झाले. यासाठी सकल मराठा व्यापार्यांच्यावतीने 22 लाख 51 हजाराची देणगी दिली आहे. हा भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थित झाला.
मराठा मंदिराच्या उभारणीसाठी आपल्या कष्टाच्या, घामाच्या पैशाची वीट लागली पाहिजे, अशी भावना ठेवून समाजबांधवांनी खारीचा वाटा उचलावा. अन्यायाला वाचा फोडण्याची, अन्यायाविरूध्द लढण्याची जबाबदारी आपल्याला छत्रपतींनी घालून दिलेली आहे. ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजाप्रति आपले उत्तरदायित्व आहे. केवळ मराठाच नव्हे तर सर्व समाजघटकांना मदतीचा हात दिला पाहिजे. मराठा समाजाच्या नेत्यांनी पक्षीय भेदाभेद विसरून समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र यावे. समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी आपण आघाडीवर आहोत. मराठा समाजाचा मार्ग सुकर करण्यासाठी जे करायचे ते खासदार म्हणून केले, असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
येथील कुर्डूवाडी रस्त्यावरील छत्रपती कॉलनी येथे मराठा एकता मंडळाच्यावतीने उभारण्यात येणार्या मराठा मंदिर या भव्य वास्तूच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या ट्रामा युनिटसाठी सहकार्य करण्याची तसेच जगदाळे मामा हॉस्पीटलच्या माढा येथील हॉस्पीटलसाठी ऍम्ब्युलन्स देण्याची ग्वाही दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अध्यक्षीय मनोगतात आ. राजेंद्र राऊत यांनी, मराठा समाजातील विविध उपक्रम, बैठकासाठी भव्य असे मराठा मंदिर असावे, अशी सर्व समाजबांधवांची इच्छा होती. त्या दिशेने आज पाऊल टाकले आहे. मराठा आरक्षणासाठी खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नाईक- निंबाळकर यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविकेत डॉ. भरत गायकवाड यांनी मराठा एकता मंडळाच्या स्थापनेचा उद्देश व इतिहास सांगत देशमुख बंधूंनी 16 हजार स्के.फूट जागा दिली. या जागेत भव्य स्वरूपात हे मराठा मंदिर होत आहे. मराठा मंदिराची उभारणी करताना कोणाशी स्पर्धा करण्याचा उद्देश नाही. मराठा मंदिरसाठी 22 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश बाजार समितीतील सकल मराठा व्यापार्यांच्यावतीने व्यापारी सचिन मडके, सौदागर नवगिरे, तुकाराम माने, अनिल गायकवाड, विलास ठोंगे आदींनी सुपूर्द केला. यावेळी दानशूर लक्ष्मण देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, जयकुमार शितोळे, शिवशक्ती नागरी सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, डॉ. गुलाबराव पाटील, कोविड योध्दा डॉ. संजय अंधारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कालिदास मुकटे, सुखदेव दिवटे, मधुकर ठोकळ, नारायण जगदाळे, दिलीप सुरवसे, किरण गाढवे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. मंगेश दहीहंडे यांनी सूत्रसंचालन केले.