सोलापूर : ओमिक्रॉन विषाणुच्या प्रार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे. एस. टी. बस बंद असल्यामुळे सध्या खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. मात्र त्यातूनही प्रवास करणाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले पाहिजे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिला आहे.
सध्या कोरोनाचा ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव पसरत आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस. टी. सेवा बंद आहे. आरटीओ विभागाकडून खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असावेत. तसेच ज्यांनी एक डोस घेतलेला आहे; मात्र दुसऱ्या डोसची अद्याप तारीख आलेली नाही. अशा व्यक्तींनी प्रवास करण्यापूर्वी ७२ तासाच्या आतील आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रवाशांनी प्रवासादरम्यान दोन्ही डोस घेतलेले प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट जवळ बाळगणे आवश्यक आहे. दि. ९ डिसेंबर २०२१ पासून प्रवासी वाहनातून प्रवास करणारे, रिक्षातून प्रवास करणारे, खासगी वाहनातून प्रवास करणारे प्रवासी व वाहन चालक यांनी नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर पोलीस ठाणे, वाहतूक शाखा आणि आरटीओ मार्फत संयुक्त मोहीम राबवून दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
* रोज साठ हजार लसीकरण नियोजन करा
सोलापूर – पुढील आठ दिवस रोज किमान ६० हजार नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केली आहे.
प्रत्येक विभागाच्या अधिनस्त असलेले कार्यालय व संस्था मधील प्रत्येकाचे लसीकरण करुन सोलापूर जिल्ह्याच्या लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. कोविड प्रादुर्भाव रोखणे कमी उपाययोजनाबाबत आयोजित बैठकीत श्रीमती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.