सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस निरीक्षकांसह सात अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी केलेल्या या कारवाईमुळे पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. रात्री उशीराने हे बदल्यांचे आदेश पडले आहेत. त्यामुळे आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळीचे वातावरण आहे.
नुकतेच विजापूर रोडवरील एका ऑर्केस्ट्रा बारवरील कारवाईमुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. तर आता पोलिस आयुक्तांनी रात्रीतून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. याच ऑर्केस्ट्रा बारवर पुन्हा दुसऱ्यांदा कारवाई झाल्याने पोलिसिंगबाबत सवाल उपस्थित होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सदर बझार पोलीस पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची बदली नियंत्रण कक्षाला करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले उदयसिंह पाटील यांची बदली सायबर पोलीस ठाण्यात झाली आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची सदर बझार पोलीस ठाण्यात बदली केली आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक बरडे यांची नियंत्रण कक्ष, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक इंद्रजीत वर्धन यांची प्रभारी अधिकारी सलगरवस्ती पोलीस ठाणे, सुरक्षा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांची सदर बझार पोलीस ठाणे, नियंत्रण कक्षातील नागेश मात्रे यांची सदर बझार पोलीस ठाणे अशी बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.