सोलापूर / मोहोळ : सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले असताना आदेशाचा भंग करून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये राजरोसपणे फिरणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या तडीपार उपमहापौराला मोहोळ पोलिसांनी गुरूवारी (१६ डिसेंबर) रात्री अकरा वाजता अटक केली.
राजेश दिलीप काळे (वय ४१, रा. फ्लॅट नं. १०१, गॅलक्सी अपार्टमेंट, वीरशैव नगर, जुळे सोलापूर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात पो. कॉ. पांडुरंग जगताप यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश दिलीप काळे यांच्या विरोधात तडीपारीचा आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉ. शरद ढावरे हे करीत आहेत. या गुन्ह्यामुळे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मोहोळ पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर महानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. राजेश काळे यांच्या वर्तणुकीमुळे सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे सोलापूर शहर पोलीस उपायुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे राजेश काळे यांना सोलापूर शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी सोलापूर पोलिसांकडून राजेश काळे यांना दौंड तालुक्यात सोडण्यात आले होते.
दरम्यान राजेश काळे हा तडीपार आदेशाचा भंग करून मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरत असल्याची गोपनीय माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी पथकाचे इन्चार्ज हेड कॉ. शरद ढावरे, पो.कॉ. हरिदास थोरात, पांडुरंग जगताप, गणेश दळवी यांच्या पथकाने १६ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता अर्जुंनसोंड पाटी येथील हॉटेल येरमाळा येथे छापा टाकला असता, राजेश काळे पोलीस पथकाच्या हाती लागला.
भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर त्यांनी राजकीय पदाचा गैरवापर करून निमयबाह्य पध्दतीने काम करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरीक व व्यवसायिकांना धमकावून पैशाची मागणी करणे, शासकीय अधिकारी व सामान्य नागरीकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, सरकारी काम करणार्या अधिकारी-कर्मचार्यांना धाकधपाटा दाखविण्याच्या उद्देशाने अंगावर जाणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. उपमहापौर काळे यांच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत.