अक्कलकोट : अक्कलकोट – सोलापूर रोडवरील लकी हॉटेलजवळ अचानकपणे दुचाकीचा पुढचा डिस्क ब्रेक दाबल्याने दुचाकीवरील दोघे भाऊ फरफटत जाऊन जोरात पडल्याने महांतेश इरय्या मठ (वय २१ रा. करजगी ता. अक्कलकोट) यास डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी ( दि १७) दुपारी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि १७ डिसेंबर रोजी शांतय्या व महांतेश इरय्या मठ दोघे भाऊ निलम नगर सोलापूर या राहण्याच्या ठिकाणाहून मूळगाव करजगी (ता. अक्कलकोट ) येथे गॅस कनेक्शन ट्रान्स्फर करण्यासाठी दुचाकीवरून अक्कलकोटला आले होते. अक्कलकोटमधील गॅस कनेक्शनचे काम आटोपून सोलापूरला जात असताना अक्कलकोटजवळ असणाऱ्या लकी हॉटेलजवळ आले.
महांतेश मठ हा सुझुकी झिक्सर स्पोर्ट दुचाकी क्र एम एच १३ डी एफ ७१४३ चालवत होता व मोठा भाऊ पाठीमागे बसला होता. महांतेशने अचानक दुचाकीचा डिस्क ब्रेक दाबल्याने गाडीसह दोघे भाऊ रस्त्यावर जोरात आदळले. यामध्ये महांतेश मठ (वय २१) यास डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला.
मोठा भाऊ शांतय्या मठ यास डोके हात पाय यांना जोरात मार लागला असून गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यावर उपचार चालू आहेत. या घटनेची फिर्याद शांतय्या मठ यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरुन सावरगावमध्ये दोन कुटुंबात हाणामारी
बार्शी : पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरुन तालुक्यातील सावरगाव (कापशी) येथील दोन कुटुंबात हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्हीकडील सहा जणांविरोधात पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत लक्ष्मी अतिश सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या आपल्या पती समवेत दिवसभर शेतात काम करुन संध्याकाळी दुचाकीवरुन घरी परतत असताना जिल्हा परिषद शाळेसमोर दोन दुचाकीवरुन आलेल्या किशोर निव्वृत्ती रणदिवे, हनुमंत दशरथ सुरवसे, अतुल गजेन्द्र सुरवसे व लाला कुबीर सुरवसे यांनी त्यांच्या दुचाकीस आपली दुचाकी आडवी लावून त्यांना थांबविले.
त्यानंतर चौघांनी, तुम्ही आमच्याविरोधात पांगरी पोलीस ठाणे येथे जाऊन तक्रार देता काय, तुम्हाला आता सोडत नाही असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरवात केली व त्याच वेळी किशोर रणदिवे यांनी तेथेच पडलेला दगड उचलून पतीच्या डाव्या बाजुच्या गळ्यावर व डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारुन जखमी केले.
आरोपींच्या तोंडाला दारू पिल्याचा वास येत होता. त्यांच्या तावडीतून सुटका करुन त्या पांगरी पोलिस ठाण्याकडे जात असताना पुन्हा त्यांना महादेव मंदिराजवळ आडवून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देवून ते पळून गेले.
किशोर निव्वृत्ती रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते बार्शी येथील कामकाज आटोपून सायंकाळी 6.30 च्या सुमारास सावरगाव येथे आले असता अतिश शिवाजी सुरवसे व धनाजी शिवाजी सुरवसे हे दोघेजण त्यांचे दुचाकीवरुन आडवे आले व त्यांची दुचाकी अडवुन शिवीगाळ करु लागले, तु आमच्या विरोधात पोलीस ठाणेस तक्रार का करतो असे म्हणुन अतिश सुरवसे याने तेथेच पडलेला दगड उचलुन पाठीत व डाव्या डोळ्याच्या जवळ मारुन जखमी केले. धनाजी सुरवसे याने लाथाबुक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.