सोलापूर : बेलाटी ( ता. उत्तर सोलापूर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ बालकांना पोलिओ लस ऐवजी कावीळ लस दिल्याने खळबळ उडाली. याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीईओ दिलीप स्वामी यांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. काल मंगळवारी (ता. २१) उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावातील आरोग्य उपकेंद्रवरील आरोग्यसेविका शिंदे यांनी पोलिओ ऐवजी बालकांना काविळीची लस दिली.
यापूर्वी काविळीची लस देण्यात आली होती. डबल वेळा लस दिली गेल्याने बालकांना त्रास होऊ लागला. लसीची रिएक्शन झाल्याने, एक बाळ बेशुद्ध पडलं, तीन बाळांना ताप आला, एकूण सात बालकांना या ठिकाणी लसीकरण झाले होते.
नागरिकांनी जेव्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा सातही बालकांना ताबडतोब जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, अशी माहिती उत्तर सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगार यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना रात्री माहिती मिळाली असता त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्वरित त्यांनी सर्व प्रकरणाची चौकशी केली, डॉक्टरांशी चर्चा केली, सर्व बालके सुखरूप असल्याचं त्यांनी सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
दरम्यान, सीईओ स्वामी यांनी या प्रकरणाची चौकशी मेडिकल कॉलेजच्या समितीकडून करणार असल्याचे सांगितले.
* मागे झाला होता बाळाचा मृत्यू
दोन वर्षांपूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावमध्ये लसीकरणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात संबंधित आरोग्य सेविकेवर कारवाई झाली पुन्हा तिला कामावर घेण्यात आले. मात्र, मयत झालेल्या बालकाच्या आई-वडिलांना कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. या शासकीय मदतीसाठी ते कायम जिल्हा परिषदेला चक्कर मारतात मात्र कुणीही दखल घेत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
* होटगी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी आणि पोलीसाला धक्काबुक्की दोघांना अटक
सोलापूर – रांगेत न थांबता कोव्हीडची लस द्या, अशी धमकी देत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि पोलिस शिपायाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी (ता. २०) दुपारच्या सुमारास घडली.
या प्रकरणात वळसंगच्या पोलिसांनी सुशिल रेवणसिद्ध घोडके (वय ३०) आणि सिद्धाराम अमोगसिद्ध सोनकवडे (वय २४ दोघे रा. होटगी टगीगाव) या दोघांना अटक करून मारहाण आणि शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला.
होटगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड आजाराची लस देण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी नागरिक रांगेत थांबून कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास सुशील घोडके आणि सिद्धाराम सोनकवडे या दोघांनी रांगेत न थांबता आत जाऊन पहिल्यांदा आम्हाला लस द्या नंतर लोकांना द्या, अशी कर्मचाऱ्यांना धमकी दिली. कर्मचाऱ्यांनी त्यांना रांगेत या असे सांगितल्यानंतर त्या दोघांनी सुभाष सतारवाले या कर्मचाऱ्यास शिवीगाळी केली. तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावले असता पोलीस शिपाई बिराजदार हे त्याठिकाणी येऊन दोघांना समजावून सांगत होते.
तेंव्हा तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका तुमचे दवाखान्यात काय काम आहे? असे म्हणत त्यांनी दोघांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. अशा आशयाची फिर्याद सुभाष मानसिंग सतारवाले या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्याने वळसंग पोलीसात दाखल केली. सहाय्यक निरीक्षक भोसले पुढील तपास करीत आहेत .