पंढरपूर : माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने आवश्यकती तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
माघी वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय होऊ नये यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल – रुक्मिणी मंदीर, नगरपालिका या पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्रांताधिकारी गुरव यांनी दिले.
आरोग्य विभागामार्फत यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथे प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. Maghi Wari: Disaster Management Cells Established at Five Places, Water Released to Lunar Region
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
तसेच नगरपरिषदेकडून दर्शन रांग, पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर व मंदीर परिसर येथे वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी बॅरेगेटींगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रदक्षिणामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिशा दर्शक फलक आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
65 एकर परिसरात मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था, अखंडीत व सुरक्षित विद्युत पुरवठा, अग्निशमन व्यवस्थेसह फिरते आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नदीपात्रात स्वच्छता व पुरेसा प्रकाश राहील याची दक्षता घेवून, शहरात कोविड-19 संसर्ग रोगप्रतिबंधक औषधाची फवारणी, शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी, वाहतुकीस कोणतेही अडचण येवू नये यासाठी शहराबाहेर मोकळया जागेवर वाहन पार्किग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यकतो बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.
□ नगरपालिकेच्या उपबंधाऱ्यातून चंद्रभागा नदीत पाणी
माघी यात्रेकरिता आलेल्या भाविकांना चंद्रभागा स्नान करता यावे, म्हणून नगरपालिकेच्या उपबंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. याकरिता बंधारा अर्धा मीटर उघडण्यात आला आहे. चंद्रभागेमध्ये भाविकांची स्नानाची सोय होणार असून, भाविकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.