पुणे : बजाज ग्रुपचे माजी चेअरमन पद्मभूषणने सन्मानित राहुल बजाज यांचे निधन झाले आहे. पुण्यात वयाच्या 83 व्या वर्षी शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहुल बजाज यांना कॅन्सर झाला होता. गेल्या वर्षी 29 एप्रिलला राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. 1972 पासून ते या पदावर होते. गेल्या 5 दशकात त्यांनी आपल्या कंपनीच्या प्रगतीसाठी मोलाची भूमिका बजावली होती.
पाच दशकापासून बजाज समूहाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवण्यात त्यांचा खूप मोठा आणि मौल्यवान वाटा आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगसमूहात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
उद्योजकांसाठी एक प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या निधनामुळे बजाज समूहाचं वैयक्तिक खूप मोठं नुकसाण झालं आहे. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. राहुल बजाज यांना 2001 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचे पार्थिव थोड्याच वेळात रुबी हॉल हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येईल. त्यांचं पार्थिक उद्या सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी कंपनीत ठेवलं जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. Padma Bhushan, veteran industrialist Rahul Bajaj passed away in Pune
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट..
राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 साली झाला. त्यांनी ६०च्या दशकात बजाज समूहाचे नेतृत्व स्वीकारले. 2005 साली त्यांनी आपले अध्यक्षपद सोडले आणि त्यानंतरपासून सुपुत्र राजीव बजाज यांनी ही जबाबदारी सांभाळली.
राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले होते. त्यांनी दिल्ली महाविद्यालयातून अर्थशास्त्रामध्ये ऑनर्स डिग्री, मुंबई महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले होते.
2008 मध्ये त्यांनी बजाज ऑटोचे तीन युनिटमध्ये विभाजन केले होते. यामध्ये बजाज ऑटो, फायनन्स कंपनी बजाज फिनसर्व्ह आणि एक होल्डिंग कंपनीचा समावेश आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान एक उद्योगपती आणि महात्मा गांधींचे प्रमुख समर्थक जमनालाल बजाज यांचे सुपुत्र राहुल बजाज होते.
□ अनेक पुरस्काराने सन्मानित
– हार्वर्ड बिझनेस स्कूलकडून ‘माजी विद्यार्थी’चा विशेष पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे.
– फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘नाइट इन द ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ म्हणून नियुक्ती केली होती.
– तसेच भारत सरकारने राहुल बजाज यांची 1975 ते 1977 या कालावधीत ऑटोमोबाईल्स अँड अलाईड इंडस्ट्रीज विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
– सन 1975 मध्ये ‘राष्ट्रीय गुणवत्ता हमी’ या संस्थेने ‘मॅन ऑफ द इयर’ या पुरस्काराने
राहुल बजाज यांना सन्मानित करण्यात आले होते.
– 1990 मध्ये राहुल बजाज यांना ‘बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
– ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ने राहुल बजाज यांना फेब्रुवारी 1992 मध्ये ‘प्रिन्स ऑफ वेल्स इंटरनॅशनल बिझनेस लीडर्स फोरम’चे सदस्य बनवले होते.
– 1996 मध्ये एफआयई फाऊंडेशनने राहुल बजाज यांना राष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले होते.
– 2000 साली राहुल बजाज यांना लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टने टिळक पुरस्काराने सन्मानित केले होते.