कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. परिणामी त्या महिलेची केंद्राबाहेरील गाडीत प्रसुती झाली. त्यानंतर डॉक्टर आल्यानं त्यांनी अर्भकाची नाळ कापली, त्यावेळी ते अर्भक दगावलं होतं. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी वेळेत उपचार केले नसल्याने अर्भक दगावल्याचा आरोप करीत कुटुंबाने कारवाईची मागणी केली.
हा प्रकार कोल्हापूर शहरानजीक पुलाची शिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडला. दवाखान्यात डॉक्टर, नर्स कोणीच नसल्याने वाहनातच प्रसूतीच्या कळा सोसत तिची प्रसूती झाली. यामध्ये अर्भकाचा दुर्दैवी अंत झाला. डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईकांनी दवाखान्याच्या दारातच धरणे धरले. अर्भकाची वाहनातच नाळ कापल्याने मृत्यू झाल्याचेही सांगितलं जातंय.
शिरोली शास्त्रीनगर येथील महिला प्रसूतीसाठी कुटुंबासमवेत खासगी वाहनातून आरोग्य केंद्रात आली. प्रसूतीकळा सुरू झाल्याने ती टाहो फोडत होती. आरोग्य केंद्रात डॉक्टर व नर्स नसल्याने उपचाराअभावी तिला कळा असह्य झाल्या व वाहनातच तिची प्रसूती झाली. Avoidance of treatment; Childbirth at the door of the health center, death of the infant
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या प्रकाराची माहिती सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव यांना निलेश शिंदे व पवन कांबळे यांनी दिल्यानंतर खवरे यांनी आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी तेथे उपस्थित डॉ. जेसिका अँड्र्यूज व परिचारिकांना धारेवर धरून जाब विचारला. या घटनेस आपण जबाबदार असल्याचे सांगितले.
शशिकांत खवरे व पीडित कुटुंबासह कार्यकर्त्यांनी दवाखान्याच्या पायरीवरच ठिय्या आंदोलन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. कर्मचार्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.
दरम्यान, हातकणंगलेच्या सभापती डॉ. सोनाली पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अँड्र्युज यांची भेट घेऊन माहिती घेतली व सकाळच्या पाळीतील कर्मचारी येण्यापूर्वी रात्र पाळीतील कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्र का सोडले, असा प्रश्न उपस्थित केला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी सभापती डॉ. पाटील यांनी केली.