पंढरपूर : विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. अन तुम्ही माझ्याकडे मुंबईत येवून पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात केलेल्या कामाचा कार्यअहवाल सादर करता. या मतदारसंघात केवळ विठ्ठल कारखानाच दिसतो का….? या कारखान्याचा प्रश्न सुटला पाहिजे मात्र यासह इतर अनेक प्रश्न असून यासाठी तुम्ही काय केले असा सवाल करीत येत्या काळात जिल्हा परिषदा आणि नगरपरिषद निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळवायचे आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदिलाने काम करा, असे आवाहन राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
जयंत पाटील यांनी आज पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला (पश्चिम महाराष्ट्र) ला आजपासून सांगोला येथून सुरुवात झाली. पंढरपूर येथील बैठकीत पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंढरपूरचे माजी नगरसेवक प्रताप गंगेकर, नगरसेवक अक्षय गंगेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष महिबुब शेख, सक्षणा सलगर, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, नागेश फाटे, रमेश बारसकर, युवराज पाटील, श्रीकांत शिंदे, संतोष सुळे, अरुण आसबे, गणेश पाटील, विजयसिंह देशमुख, दिपाली पांढरे, सुप्रिया गुंड, श्रेया भोसले, प्रणिताताई भालके, सुधीर भोसले, अॅड. दिपक पवार उपस्थित होते. Do you see only Vitthal factory …? Attended by Jayant Patil
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जयंत पाटील म्हणाले की, पंढरपूर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र पोटनिवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे मागील निवडणुकीपेक्षा आपल्या उमेदवाराला जास्त मते मिळूनही पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी बुथ कमिट्या नेमल्या नसल्याचा हा परिणाम आहे. पुन्हा नव्याने बुथ कमिट्या नेमा आणि नव्या जोमाने कामाला लागा अशा सूचना दिल्या.
जयंत पाटील पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील उपस्थित पदाधिकार्यांची हजेरी घेतली. यावेळी बोटावर मोजण्याइतकेच पदाधिकारी उपस्थित असल्याने नाराजी व्यक्त करत माझ्याकडे हेलपाटे घालण्यापेक्षा मतदार संघातील कार्यकर्त्यांकडे, नागरिकांकहे हेलपाटे मारा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केले. स्व. भारत भालके यांचे निधन झाले आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक लागली. यामध्ये स्व. भारत भालके यांची सहानुभूती आपल्या बाजूने होती. मतदार आपल्या बाजूने होते. दोन विरोधक एकत्रित येवूनही भारतनानांपेक्षा जास्त मते भगिरथ भालके यांना मिळाली, असे असतानाही होणारा पराभव हा जिव्हारी लागणार आहे. असू द्या पराभव झाला. पराभव कोणाचा होत नाही. इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता. मात्र, या पराभवातून बाहेर येवून आपण जनतेसाठी काय काम केले. याचेही आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले पंढरपूर व मंगळवेढ्याकडे स्वतंत्रपणे लक्ष देणार असून डीपीडीसीतून दिलेल्या निधीचा सदुपयोग करण्याचे आवाहन केले आहे. तर भगीरथ भालके यांनी पोटनिवडणुकीत झालेला पराभव मान्य करत येथून पुढे पक्षवाढीसाठी व मतदार संघ पुन्हा जिंकण्यासाठी मतभेद बाजूला सारुन एकदिलाने काम करणार असल्याची ग्वाही दिली.
□ वादावर पडदा टाकण्याचे आवाहन
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचाच प्रश्न नाही. तर याच्या पलीकडेही जनतेच्या काही अपेक्षा आहेत. त्याकडे लक्ष देणार आहात की नाही, असे म्हणत एकप्रकारे भगीरथ भालके, युवराज पाटील यांच्यात सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्याचे आवाहनच केले.
जर हा मतदार संघ पुन्हा लढवायचा असेल तर बुथ कमिट्या सक्रीय करा. बुथ कमिट्यांमार्फत नागरिकांचे प्रश्न सोडवा. पक्षासाठी प्रमाणिकपणे काम करणार्याला पदावर बसवा. मुंबईला माझ्याकडे चकरा मारण्यापेक्षा आपल्या मतदार संघातील नागरिकांना वेळ द्या, नागरिकांमध्ये मिसळा, त्यांचे प्रश्न सोेडवा. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवा. मग बघा तुम्हाला गाडी दुरुस्त झालेली दिसेल, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
यावेळी सर्वांसमोर तालुका अध्यक्ष , शहराध्यक्ष, युवक व युवती पदाधिकारी यांची व पदाधिकारी यांची चांगलीच हजेरी जयंत पाटील यांनी घेतली. पोटनिवडणुकीत पराभव का झाला याचे कारण आपल्याला माहीत असताना आपण काम करायला हवे. भारतनाना भालके यांचे काम खुप मोठे आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभेल असेल काम आपण करायला पाहिजे. नाना नेहमीच ३५ गावाच्या प्रश्नांसाठी माझ्याकडे यायचे अशी आठवण सांगताना आज ती योजना पूर्णत्वास आली आहे. लवकरच योजना येईल आणि या भागातील ३५ गावांच्या कामाचा प्रश्न सुटेल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
□ केंद्र सरकार लावतय चौकश्या
महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगले काम करत आहे. कोरोना काळात नागरिकांना चांगली सेवा दिली आहे, देत आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतलेल्या यादीत पहिल्या स्थानी आहे. मात्र, केंद्र सरकार विविध एजन्सींजच्या माध्यमातून चौकश्या मागे लावत आहे. एकप्रकारे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. याअगोदर कधी अशी ढवळाढवळ झालेली नसल्याचे सांगत केंद्र सरकारच्या या धोरणावर जयंत पाटील यांनी टिका केली.