मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बैठक होणार आहे. दरम्यान, नवाब मलिक हे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आली आहे. एकूण चार मालमत्तांची चौकशी सकाळपासून सुरू होती. मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती. छोटा शकील आणि हसीना पारकर जिवंत असताना त्यांच्या निगडीत काही व्यवहार झाले होते. ईडीला यासंदर्भात संशय होता. अखेर ईडीने मलिकांना अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती आहे.
कारवाई झाल्यानंतर त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मेडिकल टेस्टसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. लवकरच ईडीमार्फत त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. रुग्णालयातून मलिकांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मलिक यांच्या अटकेने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील दुसरा बडा नेता ईडीच्या कोठडीत सध्या आहे. ईडीच्या गाडीत बसताना मलिकांनी ‘लडेंगे और जितेंगे’, असं म्हटलं. मोठ्या सुरक्षेमुळे मलिकांपर्यंत पत्रकारांना पोहोचता आलं नाही. Malik arrested; Chief Minister Sharad Pawar will hold a meeting at Varsha Bungalow
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शरद पवार यांनी म्हटलंय की, यामध्ये काही नवीन आहे. आज ना उद्या होणारच होतं. जाहीरपणे अनेक विषयांवर नवाब मलिक सतत विरोधात बोलत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. नवाब मलिकांवर ईडी कारवाई करणार याची पुसटशी कल्पना होतीच. ते आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. परंतु हा सत्तेचा गैरवापर होतोय. जे केंद्र सरकारविरोधात बोलतात अथवा केंद्रीय यंत्रणांबाबत बोलतात, त्यांना नोटीस दिली जात आहे. त्यांची चौकशी होते. सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
राज्यातील सर्व घोटळे माहीत असताना मुख्यमंत्री ठाकरे एकही शब्द बोलत नाहीत. राज्यातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार, घोटाळा यावर मुख्यमंत्र्यांना जनतेला उत्तर द्यावे लागले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार माफियांना मदतच करत आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची सर्व कारस्थाने आता बाहेर येऊ लागली आहेत. ईडीच्या चौकशीच्या निष्कर्षाची वाट पाहत आहे. नवाव मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचेही किरीट सोमय्यांनी सांगितले.
दरम्यान राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात सायंकाळी बैठक होणार आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे.