नवी दिल्ली : रशियाने धमकी दिली आहे. अमेरिकेने लादलेले निर्बंध कायम राहिले तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) पडू शकते, असे रशियाचे अंतराळ संस्थेचे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी म्हटले आहे. ‘जर तुम्ही सहकार्य करणे सोडले तर ISS अनियंत्रित होऊन अमेरिकेत किंवा युरोपमध्ये पडू शकते, 500 टनाचा हा स्ट्रक्चर भारत किंवा चीनवर पाडण्याचाही पर्याय आहे, तुम्ही सांगा, पाडायचा का?’ असे दिमित्री यांनी म्हटले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्यामुळे जगभरात तणावाचं वातावरण आहे. अमेरिकन सरकारने रशियावर दबाव टाकण्यासाठी बंधने लादली आहे. यावर रशियाने ही प्रतिक्रिया दिली. अमेरिकेने रशियावर घातलेल्या बंधनांमुळे स्पेस स्टेशन संदर्भात असणारा सहकार्य कार्यक्रम संपुष्टात येईल. त्यामुळे स्पेस स्टेशनवर नियंत्रण जाऊन अन्य देशांना धोका होईल. तेव्हा 500 टन वजनाचे हे अनियंत्रित स्पेस स्टेशन भारत किंवा चीनवर टाकणे हा पर्याय असल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं.
पुतीन यांनी अमेरिकेसह सर्वच देशांना इशारा दिला आहे. आमच्याकडे अणुबॉम्ब असल्याची धमकी रशियाने दिली आहे. ‘आवश्यकता पडली तर आम्ही त्याचा उपयोग करु,’ अशी धमकी रशियाने दिली आहे. रोगोझिन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “तुम्ही आमच्याशी सहकार्य थांबवल्यास, ISS कुठेही अनियंत्रितपणे पडू शकते. विशेषतः ते युरोप किंवा अमेरिकेत पडू शकते. तसेच आमच्याकडे भारत किंवा चीनवर स्पेस स्टेशन पाडण्याचा पर्याय असल्याचेही त्यांनी म्हटलं. सध्या अमेरिका, रशिया आणि जर्मनीसारखे अनेक देश आयएसएसवर एकत्र काम करत आहेत. याअंतर्गत चार अमेरिकन, दोन रशियन आणि एक जर्मन अंतराळवीर मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये एकत्र काम करत आहेत.
युक्रेन-रशिया युध्दाच्या तिसऱ्या दिवशी रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री गोळीबारांच्या आवाजाचे परिसरात भीती निर्माण झाली आहे. अखेर युक्रेन सध्या माघार घेण्याच्या तयारीत आहे. Russia’s threat : option to launch space station on US, India or even China?
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
युक्रेनचे अध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी शुक्रवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की आम्ही रशियाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. देशाचे सोडून कुठेही जाणार नाही. आम्हाला काही देशांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ई-मेल पाठवून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याबरोबरच काही सूचनाही दिल्या आहेत. काल शुक्रवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. भारत-युक्रेन संबधाचा उपयोग करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
युक्रेनमध्ये युद्धामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत विविध देश या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने या युद्धाचानिषेध केला असून युक्रेनमधील अलीकडच्या घडामोडींनी भारत खूपच अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. हिंसा आणि शत्रुत्व ताबडतोब संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जावेत अशी आमची विनंती आहे. मानवी जीवनाच्या किंमतीवर कोणताही उपाय शोधला जाऊ शकत नाही, अशी भूमिका भारताने मांडली आहे.
● रशिया- युक्रेन युद्ध- लाईव्ह अपडेट्स
– रशियाने केलेल्या हल्ल्यात 198 लोक ठार झाले असून, हजाराहून अधिक नागरिक जखमी झाले आहे, अशी माहिती युक्रेनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
– युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय नागरिकांना घेऊन पहिल्या
विमानाने रोमानियाहून उड्डाण केले आहे.
– युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धानंतर जगाने दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहावे असा इशारा फ्रान्सने दिला आहे.
◇ सोलापुरातील सहा विद्यार्थी युध्दामुळे अडकले युक्रेनमध्ये
सोलापूर : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. त्यामुळे तेथे अडकून पडलेल्या व्यक्तीना मायदेशी परत आणण्याचे काम चालू आहे. यात सोलापुरातील सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातच आता हाती आलेल्या वृत्तानुसार २१९ भारतीयांना घेऊन पहिले विमान भारताकडे रवाना झाले आहे. यात या विद्यार्थ्यांचाही समावेश असू शकतो.
परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युध्द सुरु असल्याने व विमानसेवा बंद झाल्याने अडकून पडले आहेत. परिणामी तिकीट काढूनही त्यांना तेथेच राहावे लागल्याने कुटुंबातील सदस्यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, कुटुंबातील सदस्य परदेशात अडकलेल्या आपल्या मुलांना व्हॉट्सॲप कॉलिंग करून सातत्याने विचारपूस करीत आहेत. मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी या सहा मुलांची नावे जिल्हा प्रशासनाकडे कळविल्याची माहिती देण्यात आली.
प्रथमेश शिवाजी कांबळे (ब्रम्हपुरी), (मंगळवेढा), प्राजक्ता प्रथमेश माने (मंगळवेढा) हे तीन विद्यार्थी एम.बी.बी.एस.च्या प्रथम वर्षात तर रितेश गवळी (मंगळवेढा), सुप्रिया खटकाळे (मंगळवेढा), अभिजित चव्हाण (आंधळगाव) हे तिघे तिसऱ्या वर्षात शिकत आहेत.
युक्रेनपासून ६०० कि.मी. अंतरावर असलेल्या डेनिफ्रो येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. युध्द सुरु झाल्यानंतर संरक्षणासाठी ते आपल्या मायदेशी विमानाचे तिकीट काढून निघाले असतानाच विमान सेवा बंद झाल्याने त्यांना पुन्हा आपल्या कॉलेजच्या हॉस्टेलवर परतावे लागले.
या परदेशात शिक्षण घेणाऱ्या सहा मुलांच्या पालकांनी पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आहे. आवताडे हे सध्या मुंबईमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून फडणवीस हे दिल्लीच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून त्या मुलांना सुरक्षितरीत्या महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे.
□ २१९ भारतीयांना घेऊन पहिले विमान रवाना
युक्रेनमध्ये तिसऱ्या दिवशीही बाँबहल्ले होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत. भारताने तातडीने नवीन एडवायजरी जाहीर केली आहे. यामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांनी अधिकाऱ्यांना न सांगता बॉर्डर किंवा पोस्टचौकीवर येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईवरून एअर इंडियाचे विशेष विमान रवाना करण्यात आले होते.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी वेगाने हालचाली केल्या जात असून भारतीयांना रोमानियातून एअर इंडियाच्या विमानाने आणलं जात आहे. सध्या २१९ भारतीय नागरिकांसह रोमानियाहून विमान मुंबईला रवाना झाले आहे अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.