नवी दिल्ली : भांडवली बाजाराची नियामक संस्था ‘सेबी’च्या अध्यक्षपदी माधवी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेबी ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रथमच एका महिलेची नियुक्ती झाली आहे.
सोमवारी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याआधी अजय त्यागी अध्यक्ष होते. माधवी पुरी बुच या पुढील तीन वर्षे अध्यक्ष म्हणून ‘सेबी’चा कार्यभार सांभाळणार आहेत. यापूर्वी ‘सेबी’च्या पूर्णवेळ संचालक म्हणून माधवी यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शांघाय येथील विकास बँकेच्या सल्लागार म्हणूनही त्या कार्यरत होत्या.
सेबीकडून नव्या नेतृत्वाचा शोध सुरु होता. यात देवाशिष पांडा, अनिल मुकीम आणि माधवी पुरी बूच ही तीन नावे आघाडीवर होती. त्यात माधवी पुरी बूच यांची सरशी झाली आहे. निवड समितीने माधवी पुरी बूच यांच्यावर विश्वास दाखवला असून त्यांची सेबीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती केली आहे.
पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आलेले मावळते अध्यक्ष अजय त्यागी यांची त्या जागा घेतील.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रारंभिक तीन वर्षांच्या कालावधीसाठी बुच यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तथापि या संबंधाने औपचारिक आदेश लवकरच काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सेबीच्या पूर्णवेळ संचालक म्हणून बुच यांची कारकीर्द राहिली आहे. Madhavi Puri became the first woman president of SEBI
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
चीनमध्ये शांघाय येथे मुख्यालय असलेल्या नवीन विकास बँकेच्या बुच या सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल या खासगी गुंतवणूकदार संस्थेच्या सिंगापूरस्थित कार्यालयाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्याआधी बुच यांचा आयसीआयसीआय समूहात प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या.
प्रतिष्ठित सेंट स्टिफन्स कॉलेजच्या पदवीधर असलेल्या बुच यांनी आयआयएम, अहमदाबाद येथून व्यवस्थापन शास्त्रात पदवी मिळविली आहे. सेबीचे मावळते अध्यक्ष त्यागी हे हिमाचल प्रदेशच्या १९९४ सालच्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. १ मार्च २०१७ रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आणि नंतर ऑगस्ट २०२० मध्ये त्यांचा कार्यकाळ आणखी १८ महिन्यांनी वाढवण्यात आला.
सेबीच्या कायद्यानुसार, अध्यक्षाची नियुक्ती कमाल पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्यानुसार केली जाते. तथापि, त्यागी यांनी ज्यांच्याकडून पदभार घेतला ते यू. के. सिन्हा हे दोनदा मुदतवाढ मिळाल्याने सहा वर्षे सेबीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. तर त्याआधी सर्वात जास्त काळ म्हणजे सात वर्षांसाठी सेबीचे अध्यक्षपद हे डी. आर. मेहता यांनी भूषविले आहे.