● टाकळी सिकंदरमध्ये कोयत्याने वार करून १ लाखाची चोरी
मोहोळ : कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊसतोड मजुरांची दोन मुली व एका पाच वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे.
ही घटना शुक्रवारी (ता. ४) घडली. यातील अजय जाधव याचा मृतदेह आज शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान हाती लागला. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील ऊसतोड कामगार मोहोळ तालुक्यात तोडणीसाठी आले आहेत. या कामगारांपैकी हिरामण रंगनाथ गायकवाड (रा. तडपांगरी ता. जि. परभणी), अंकुश जाधव व बाळू जाधव (रा. बोरवंड खुर्द, ता. जि. परभणी) हे देखील आपल्या कुटुंबासमवेत मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे ऊस तोडणीसाठी आले आहेत.
या तिघाजणांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ऊस तोडणीसाठी फडात गेले होते. त्यादरम्यान त्यांच्या कोपीवर सुरेखा हिरामण गायकवाड, रेणुका अंकुश जाधव व अजय बाळू जाधव असे तिघेजण थांबले होते. सायंकाळी ६ वाजता ऊसतोडी करून सर्वजण कोपीजवळ आले असता, त्यांना सुरेखा, रेणुका व अजय असे तिघेजण दिसले नाहीत. आजूबाजूला शोधाशोध केली मात्र ते मिळून आले नाहीत.
सर्वजण थोड्या अंतरावर असलेल्या एका ओढ्याजवळ गेले असता त्यांना पाण्यावर ओढणी तरंगताना दिसली. त्यावरून तिघेजण पाण्यात पडल्याचा संशय बळावला व ग्रामस्थ पोलीस प्रशासनाच्या मदतीने रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान सुरेखा व रेणुका या दोघींचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
शोध घेऊनही अजयचा मृतदेह सापडत नसल्याने तसेच अंधाराचा अडथळा होत असल्याने सुरेखा व रेणुका या दोघींचे शव घेऊन त्यांचे वडील मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री १२ च्या दरम्यान दाखल झाले. आज शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ५ वर्षीय अजय जाधव याचा मृतदेह हाती लागला.
यात मोहोळ पोलिस ठाण्यात या तिन्ही मुलांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत. Three children of sugarcane workers drown in Solapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ मदतीस आलेल्या शेजाऱ्यास गंभीर जखमी करीत टाकळी सिकंदरमध्ये १ लाख १९ हजाराची चोरी
मोहोळ : मदतीस आलेल्या शेजाऱ्याला डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून चोरट्यांनी एक लाख १९ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यानी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास टाकळी सिकंदर येथे घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर शिवाजी डोंगरे आपल्या कुटुबासह रात्रीदहा वाजण्याच्या दरम्यान झोपी गेले. आज शनिवारी पहाटे १ वाजण्याच्या दरम्यान त्यांची आई संगीता डोंगरे यांनी सागर डोंगरे यांना हाक मारून उठवले व कोणीतरी दरवाजा वाजवत असल्याचे सांगितले. तेव्हा सागर हे त्यांच्या खोलीतून बाहेर आले व मांजर वगैरे असेल तू झोप असे म्हणून त्यांच्या खोलीत निघून गेले.
तेवढ्यात त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा चोरट्यांनी जोरात ढकलून उघडला. त्यावेळी संगीता या मोठ्याने ओरडत सागर यांच्या खोलीजवळ गेल्या असता सागर यांनी त्यांना दरवाजा उघडून आत मध्ये घेतले व दरवाजा आतून बंद केला. चोरट्यांनी त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली. आपल्या घरात चोरटे शिरल्याचे लक्षात आल्यानंतर सागर डोंगरे यांनी त्यांचे चुलते दाशोद डोंगरे यांना फोन केला व घटनेची माहिती दिली.
त्यांनी आमच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला असल्याचे सांगितले. त्यानंतर सागर यांनी जवळच राहणारे ज्ञानेश्वर उत्तम जानकर यांना फोन केला. त्यावेळी जानकर हे डोंगरे यांच्या घराच्या दरवाजाजवळ आले असता त्यातील
एका चोरट्याने त्यांच्यावर कोयत्याने डोक्यात वार केला. त्यातूनही डोंगरे यांनी त्याला प्रतिकार करत दाशोद डोंगरे यांच्या घराचा दरवाजा उघडला व आरडाओरडा सुरू केला. त्यांच्या आरडाओरडया मुळे जानकर यांची पत्नी व मुलगा घराबाहेर पळत आले.
सगळ्यांचाच मोठा गोंधळ सुरू झाल्यानंतर चोरटे पळून गेले. मात्र त्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये ज्ञानेश्वर जानकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
चार अज्ञात चोरट्यांनी सागर डोंगरे यांच्या घरातील कपाट उचकटून त्यातील १ लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व सागर यांच्या पॅन्टच्या खिशातील रोख ४ हजार रुपये असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला, याप्रकरणी सागर डोंगरे यांनी अज्ञात चोरट्यांनी विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.