□ पन्नास जणांना मिळणार कायमस्वरूपी रोजगार
सोलापूर : सहानुभूती अथवा तात्पुरती मदत करण्याऐवजी वारांगना व तृतीयपंथीयांना स्वाभीमानाने स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून भोगाव येथील बायो एनर्जी प्लांट येथे स्वाभिमानी रोजगार पॅटर्न राबविण्यात येत आहे. देशात महापालिकेच्या माध्यमातून प्रथमच असा अभिनव पॅटर्न राबविला जात आहे.
वारांगना व तृतीयपंथी यांना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. फार तर काही वेळा प्रसंगी त्यांना सहानुभूती दाखवली जाते. कधी तात्पुरती मदत दिली जाते, मात्र वारांगना व तृतीयपंथी यांना स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशातून भोगाव येथील बायो एनर्जी प्लांट येथे वारांगना व तृतीयपंथीयांना रोजगार दिला जाणार आहे. अशी माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. Swabhimani employment pattern for third parties through Municipal Corporation
सुमारे 50 वारांगना व तृतीयपंथीयांना या कायमस्वरूपी रोजगाराच्या माध्यमातून दरमहा किमान वेतन दिले जाणार आहे. यातून त्यांना मोठा उदरनिर्वाहाचा आधार मिळेल तसेच स्वावलंबी जीवन जगता येईल. सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून भोगाव येथील बायोएनर्जी प्लांट च्या सहकार्यातून हा अभिनव पॅटर्न राबविण्यात येत आहे असेही उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले.
महापालिकेच्या माध्यमातून राबविला जाणारा अशा प्रकारचा हा स्वाभिमानी रोजगार पॅटर्न पहिलाच असावा ही बाब निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे यामुळे वारांगना व तृतीयपंथी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल यात शंका नाही.