मोहोळ : अंकोली (ता मोहोळ) येथील हॉटेल मालकाच्या अकरा वर्षे वयाच्या मुलाला त्यांच्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या आचाऱ्याने पैशाचा व भांडणाचा राग मनात धरून पळवून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी आचाऱ्याच्या विरोधात शुक्रवारी (११ मार्च) मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे नागेंद्र शर्मा (रा बिहारीपूर ता. इटवा उत्तरप्रदेश) यांनी एक हॉटेल भाडेतत्त्वावर घेतले आहे. त्याठिकाणी शर्मा हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांचा मावसभाऊ सोनू ओझा (रा. मेहदागाव ता. भिंड उत्तरप्रदेश) हा आचारी म्हणून कामाला होता, हॉटेल चांगले चालत असल्याचे त्याला माहिती आहे.
त्यातूनच त्याने यापूर्वी हॉटेलच्या गल्ल्यातील पैसे चोरले होते.
१० मार्च रोजी ओझा याने हॉटेलचे मालक शर्मा यांच्या पत्नीकडून गावी पैसे पाठवण्याचे कारण सांगून २० हजार रुपये घेऊन तो सोलापूरला गेला होता. त्यानंतर ११ मार्च रोजी सायं ४ वा च्या दरम्यान हॉटेलजवळ आला. त्यावेळी शर्मा यांचा मोठा मुलगा अमन हा त्याच्याजवळ गेला होता. थोड्या वेळानंतर शर्मा यांच्या पत्नी व दुसऱ्या कामगाराने अमन व ओझा यांना बघितले मुलगा अमन हा ओझा सोबत होता, ते दोघेही दिसत नाहीत याची कल्पना मुलाचे वडील शर्मा यांना आली.
सर्वांनी मिळून त्यांना अंकोली मोहोळ सोलापूर या ठिकाणी शोधले असता तो मिळून आला नाही. दरम्यान ओझाच्या मोबाईलवर संपर्क करण्यात आला. मात्र त्याचा मोबाईल बंद लागत होता. त्यावेळी ओझा याने अमनला पळवून नेले, याची खात्री झाली. याप्रकरणी अमनची आई सुसमा देवी नागेंद्र शर्मा यांनी सोनू ओझा याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सत्यवान पाटील करत आहे. Solapur: Acharya kidnaps 11-year-old hotel owner’s son
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ तामलवाडी टोल नाक्याजवळ खाजगी बसच्या धडकेने दुचाकी चालक ठार
सोलापूर – तुळजापूर मार्गावरील तामलवाडी टोलनाक्याजवळ खाजगी बसच्या धडकेने दुचाकी चालक ठार झाला. हा अपघात शुक्रवारी (ता. ११) रात्रीच्या सुमारास घडला. विनोद सुरेश मोरे (वय २७ रा. तामलवाडी ता.तुळजापूर) असे मयताचे नाव आहे.
विनोद रात्री ११ वाजेच्या सुमारास सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने निघाला होता. तामलवाडी टोल नाक्याजवळ एनएल०१-बी-१९८२ या क्रमांकाची खाजगी बस धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला. या अपघाताची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
□ टेंभुर्णीजवळ दुचाकी घसरल्याने तरुण ठार
सोलापूर – वेगाने जाणारी दुचाकी घसरल्याने एक जण ठार तर दुसरा जखमी झाला. हा अपघात टेंभुर्णी ते वेणेगाव रस्त्यावर शुक्रवारी (ता. ११) सायंकाळच्या सुमारास घडला.
राहुल बाळू कुडाळकर (वय २६ रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे) असे मयताचे नाव आहे. तो सायंकाळच्या सुमारास दिगंबर मुंडे (वय २४ रा.कडबे गल्ली,पंढरपूर) याच्या सोबत दुचाकीवरून टेंभुर्णी ते वेणेगाव असा प्रवास करीत होता. वाटेत दुचाकी घसरल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी राहुल कुडाळकर हा शनिवारी दुपारी मरण पावला. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
□ नळदुर्ग अपघात; जखमीचा मृत्यू
नळदुर्ग येथे अपघातामध्ये जखमी झालेला अविनाश संजय कांबळे (वय २० रा. नळदुर्ग ता.तुळजापूर) हा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज शनिवारी (ता. १२) मरण पावला. तो ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास नळदुर्ग येथील घरापासून बसस्थानकाकडे निघाला होता. भीमनगर येथे स्पीड ब्रेकर वरून दुचाकी आदळल्याने तो खाली कोसळून जखमी झाला होता. त्याला नळदुर्ग येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.