सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर काल रविवारी रात्री कोंडी नजीक – भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर १९ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक चालकास पोलीसांनी आज ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान या प्रकरणी ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत वारकऱ्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत द्यावी. जखमींना एक लाख रुपये देण्यात यावी, अशी मागणी वारकरी मंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
सुधाकर इंगळे महाराज यांच्या नेतृत्वात आज हे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नावाने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. काल रात्री नऊच्या सुमारास अपघात झाल्यानंतर ग्रामीण पोलीसांनी सर्व जखमींना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. १९ पैकी ४ जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
त्यांच्यावर ४ अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी तसेच सिव्हील हॉस्पिटल येथे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी भेट दिली. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पंढरपूरच्या दिशेनं निघालेले वारकरी होते. या ट्रॉलीवर मागून आलेला ट्रक वेगात आदळला आणि हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. Truck driver arrested for demanding financial help
■ एकादशीच्या आदल्यादिवशी वारक-यांवर काळाचा घाला; पाच ठार, १९ जखमी
सोलापूर : वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला माल ट्रकने मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात ५ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांना पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीजवळ हा अपघात झाला आहे. एकादशीनिमित्त पंढरपूरला जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिली. यात पाच भाविक ठार तर १९ जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ रविवारी (ता. १३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृत आणि जखमी कदमवाडी (ता. तुळजापूर) येथील रहिवासी आहेत.
भागाबाई जरासन मिसाळ(वय ६०), तुकाराम सुदाम शिंदे (वय २०), जरासन माधव मिसाळ (वय ६०), ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंखे (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील रहिवासी आहेत. राम शिंदे (वय ५०), मच्छिंद्र मोरे (वय ५६), आनंद मिसाळ (वय ६०), समाधान शिवाजी कदम (वय ४०), आकाश किसन गिरी (वय ६५), मंदा कदम (वय ५०), सुलभा साळुंके (वय ५०), जयश्री साळुंके (वय ४०), समर्थ साळुंके (वय २५), निर्मला कदम (वय ४०), शीतल शिंदे (वय ३५), शुभम अंकुश शिंदे (वय २५), नागनाथ साळुंके (वय ४५), समर्थ साळुंके (वय १६), तानाजी थोडसरे (वय १७) आदी जखमी झाले आहेत. आणखीन जखमींची नावे व त्यांचा पत्ता शोधण्याचे कामकाज सुरू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अपघातासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
सोमवारी एकादशी असल्याने तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील ४० ते ४५ वारकरी ट्रॅक्टरमधून पंढरपूरला जात होते. सोलापूर ओलांडून सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ आल्यानंतर त्या ट्रॅक्टरला एका ट्रकचालकाने (एमएच १२, टीव्ही ७३४८) मागून जोरदार धडक दिली. अपघात येवढा भीषण होता की ट्रकचालकाने ट्रॅक्टरला १०० ते १५० फुटापर्यंत फरफटत नेले.
अपघातात महामार्गालगतच्या पुलाचे लोखंडी कठडे तुटून पडले. ट्रॅक्टर पलटी झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून, तो दारूच्या नशेत असल्याची माहिती आहे. ट्रॅक्टरमधील अनेकजण महामार्गावर उडून पडले होते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.
वाहतूक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जखमींना सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातातील मयत व जखमी हे कदमवाडी (ता. तुळजापूर) येथील रहिवासी आहेत.