मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का?, असा सवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज पुन्हा एक पेन ड्राईव्ह सादर केला. भाजपच्या काळात रश्मी शुक्ला यांनी बच्चू कडू, संजय काकडे आणि त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांचे फोन टॅप केले असाही आरोप त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर देताना वळसे पाटील बोलत होते.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात उत्तर दिले आहेत. आम्ही पेन ड्राईव्हचा तपास करणार आहोत. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकिलपत्राचा राजीनामा दिला आहे, तो राजीनामा स्विकारला देखील आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री पाटील यांनी केली.
चार दिवसांपूर्वी विधानसभेत पेन ड्राईव्हद्वारे ‘व्हिडीओ बॉम्ब” टाकल्यानंतर आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह सभागृहात सादर केला. यावरून गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे. “Has Devendra Fadnavis set up a detective agency?”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी राज ठाकरे यांना ३३ हजार जल विहिरींच्या जलयुक्त शिवारांचा एक पेन ड्राईव्ह दिला होता. दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांना आणखी एक पेन ड्राईव्ह दिला आणि आज तिसरा पेन ड्राईव्ह दिला. त्यामुळे आपण एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली आहे का?, असा टोला पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे.
“मी सुद्धा गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे. खऱ्या अर्थाने मला पोलिसांचा अभिमान आहे आणि देशात कायद्याने नियमाने काम करणारं पोलीस दल हे महाराष्ट्रात आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. परंतु ज्या पोलीस दलाचा अभिमान तुम्हाला आहे, त्याच पोलीस दलावर विश्वास न ठेवता, प्रत्येक प्रकरण सीबीआय किंवा दुसऱ्या केंद्रीय तपास यंत्रणेकडे पाठवणं हे बरोबर नाही, अशी खोचक टीकाही पाटील यांनी केली.
तपास अधिकाऱ्याकडे तपासाचं काम असतं. त्याने 24 लोकांचे जवाब घेतले. त्यांना जे जे वाटलं तसा त्यांनी तपास केला. सीआरपीसीच्या 160 च्या नोटीसमध्ये दुसरं काही नाही. तपास अधिकाऱ्यांना कुणालाही जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्याचा अधिकार आहे. आधी प्रश्नावली पाठवली होती. पण त्या नोटिशीला विरोधी पक्षनेत्यांना काही कारणाने उत्तर देता आलं नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपास अधिकाऱ्याने 160 ची नोटीस पाठवली. याचा अर्थ होतो की तुम्ही जबाब द्या. तो जबाब पोलीस ठाण्यात घ्यायचा की घरी जाऊन घ्यायचा याची चर्चा झाली आणि जबाब घेतला, असे दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले.