● ट्रॅक्टरला १०० ते १५० फुटापर्यंत नेले फरफटत
सोलापूर : वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला माल ट्रकने मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात ५ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांना पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीजवळ हा अपघात झाला आहे. एकादशीनिमित्त पंढरपूरला जात असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिली. यात पाच भाविक ठार तर १९ जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ रविवारी (ता. १३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृत आणि जखमी कदमवाडी (ता. तुळजापूर) येथील रहिवासी आहेत.
भागाबाई जरासन मिसाळ(वय ६०), तुकाराम सुदाम शिंदे (वय २०), जरासन माधव मिसाळ (वय ६०), ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंखे (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील रहिवासी आहेत. राम शिंदे (वय ५०), मच्छिंद्र मोरे (वय ५६), आनंद मिसाळ (वय ६०), समाधान शिवाजी कदम (वय ४०), आकाश किसन गिरी (वय ६५), मंदा कदम (वय ५०), सुलभा साळुंके (वय ५०), जयश्री साळुंके (वय ४०), समर्थ साळुंके (वय २५), निर्मला कदम (वय ४०), शीतल शिंदे (वय ३५), शुभम अंकुश शिंदे (वय २५), नागनाथ साळुंके (वय ४५), समर्थ साळुंके (वय १६), तानाजी थोडसरे (वय १७) आदी जखमी झाले आहेत. आणखीन जखमींची नावे व त्यांचा पत्ता शोधण्याचे कामकाज सुरू आहे. SOLAPUR: A tractor collided head-on with a Warkari Dindi; 5 killed, 19 injured
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोमवारी एकादशी असल्याने तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील ४० ते ४५ वारकरी ट्रॅक्टरमधून पंढरपूरला जात होते. सोलापूर ओलांडून सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळ आल्यानंतर त्या ट्रॅक्टरला एका ट्रकचालकाने (एमएच १२, टीव्ही ७३४८) मागून जोरदार धडक दिली. अपघात येवढा भीषण होता की ट्रकचालकाने ट्रॅक्टरला १०० ते १५० फुटापर्यंत फरफटत नेले.
अपघातात महामार्गालगतच्या पुलाचे लोखंडी कठडे तुटून पडले. ट्रॅक्टर पलटी झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून, तो दारूच्या नशेत असल्याची माहिती आहे. ट्रॅक्टरमधील अनेकजण महामार्गावर उडून पडले होते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.
अपघातासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
वाहतूक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जखमींना सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातातील मयत व जखमी हे कदमवाडी (ता. तुळजापूर) येथील रहिवासी आहेत.