□ पंधरा लाखाचा ऐवज जप्त
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील फपाळवाडी या गावात तीन शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अफूची लागवड केली होती, गुप्त बतमीदारामार्फत माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शेतावर जाऊन धडक कारवाई केली असता शेतात अफूची लागवड केल्याची घटना उघडकीस आली.
बार्शी शहरालगत असलेल्या फपाळवाडीच्या शिवारात अफु पिकविली जात असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. शिवाजी जायपत्रे यांना मिळाली होती. त्यांनी लगेच आपल्या सहकार्यांसह शेतात धाव घेतली असता सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीची 729 किलो अफु या प्रतिबंधित अंमली पदार्थाची लागवड आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी रामेश्वर गोरख फपाळ, अरुण धर्मा फपाळ आणि दत्तात्रय उर्फ दादा रामभाऊ फपाळ यांच्याविरोधात अंमली पदार्थाची बेकायदेशीररित्या लागवड केल्याप्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 15 व 18 प्रमाणे कारवाई केली आहे.
प्रतिबंधित अंमली पदार्थ अफूची लागवड केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी रामेश्वर गोरख फपाळ, अरुण धर्मा फपाळ , दत्तात्रय उर्फ दादा रामभाऊ फपाळ यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर शुक्रवारी (ता.11) रात्री गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 15 व 18 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना तत्क्षणीच अटक करण्यात आली होती. Barshi: Three of the opium growers were sent to police custody
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शहरालगत असलेल्या फपाळवाडी शिवारात कांदा आणि भुईमुगाच्या पिकामध्ये वरील आरोपींनी अफूची लागवड केली होती. त्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, सहा.पो.नि. शिवाजी जायपत्रे, एएसआय दिलीप ठोंगे, हवालदार सहदेव देवकर, राजेंद्र मंगरुळे, गोरख भोसले, दशरथ बोबडे, सुभाष सुरवसे, नाईक धनराज केकाण, संदेश पवार, आप्पासाहेब लोहार, विलास भराटे, महेश डोंगरे, प्रमोद केकाण, अभिजीत गाटे, रुपेश शेलार, अभिजीत उंदरे, अंमलदार माधव धुमाळ, प्रल्हाद अकुलवार, गणेश चव्हाण यांच्या पथकाने शेतात जावून तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी महसूल नायब तहसीलदार ए.डब्ल्यू. काझी, तलाठी वदुलवाड, पंचायत समितीचे प्रतिनिधी दिनेश नरहारी शिंदे, रावसाहेब विश्वनाथ पाटील वैद्यमापन शास्र कार्यालयातील कर्मचारी बाळासाहेब नाना खाडे, कृषी अधिकारी जिवन श्रीरंग जगदाळे व कृषी सहाय्यक-अविनाश भगवान डोळसे यांच्या पथकाने शेतात जावून पाहणी केली.
यावेळी फपाळवाडी ते अरणगाव रस्त्यावर भुईमूग, मका आणि चिंचेच्या झाडाजवळ शेवरी बनाच्या शेजारी पुर्वेस भुईमुगाच्या पिकात अफु(खसखस) ची लागवड केलेली दिसली. रामेश्वर फपाळ अरुण फपाळ, दत्तात्रय फपाळ यांनी अफूचे पिक बेकायदेशीरपणे लावल्याची कबुली दिली.
त्यांच्या शेतात अनुक्रमे 96,380/- रु, 2,42,880/- रु. व 10,37,220/- रु. किंमतीचे अफुची झाडे मिळून आली. त्यांनी शेतात प्रतिबंधीत असलेल्या अफूची (खसखस) पिकाची अनाधिकृतपणे लागवड करुन ती व्यापारीदृष्ट्या विकण्याच्या उद्देशाने जोपासली असल्याने त्यांच्यावर पोलीस उपनिरीक्षक प्रविण जोतीराम जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.