नवी दिल्ली : पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू, उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांनी राजीनामा दिला. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनीही आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबसह इतर चार राज्यांमध्येही काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संघटनात्मक बदलाचे संकेत दिले गेले असून प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.
त्यानुसार सिद्धू यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. सिद्धूंनी ट्विटरला आपण राजीनामा दिल्याची माहिती दिली असून सोबत पत्रही जोडलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षांच्या इच्छेनुसार राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. 3 Congress state presidents including Sidhu resign
As desired by the Congress President I have sent my resignation … pic.twitter.com/Xq2Ne1SyjJ
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) March 16, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
काँग्रेस अध्यक्षांच्या इच्छेनुसार मी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. सिद्धूंनी एका ओळीत पत्र लिहून राजीनामा दिला आहे. नवज्योत सिंग सिद्धू आपली जागा वाचवू शकले नाही. तसेच काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री चन्नीसुद्धा आपली जागा वाचवण्यात अपयशी ठरले आहेत. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचे खापर सिद्धू आणि चन्नी यांच्यावर फोडण्यात आले आहे.
काँग्रेस नेतृत्वाने राजीनामे मागितल्यानंतर काही वेळातच उत्तराखंडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. अजय कुमार लल्लू यांनी यूपी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत असून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभारी आहे. असे अजय कुमार लल्लू यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या पराभवानंतर हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुरमध्ये झालेल्या पराभवावर चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत सोनिया गांधी यांनी संबंधित राज्यांतील अध्यक्षांचे राजीनामे मागितले आहेत, अशी माहिती काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी दिली.