बार्शी : बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील जवान विठ्ठल रामभाऊ खांडेकर (वय ४०) यांना काश्मीर मध्ये सेवा बजावत असताना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज शनिवारी (ता.२) दुपारपर्यंत गावी पोहचणार आहे. त्यांच्यावर गावीच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलात असलेले खांडेकर सध्या काश्मीरमधील पुलवामा येथील छावणी मध्ये कार्यरत होते. त्यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या वीर मरणाचे वृत्त गावी येताच परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी सोनाली, मुलगा ओमकार (वय ८ वर्षे), मुलगी स्नेहल (वय ६ ) वडील रामभाऊ, भाऊ सयाजी असा परिवार आहे.
विठ्ठल खांडेकर २००४ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. त्यांची प्रथम नेमणूक हरियाणा राज्यात झाली होती. त्यानंतर जम्मू, पुणे येथे सेवा बजावून नुकतेच ते काश्मीर मधील पुलवामा येथे गेले होते. एक महिन्यापूर्वी ते गावी सुट्टीवर आले होते.
Khandekar, a jawan of Barshi, died a heroic death in Kashmir
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन
सोलापूर : जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले कासारवाडी (ता. बार्शी) येथील जवान विठ्ठल खांडेकर यांचा जम्मू येथे सराव सुरू असताना चक्कर आल्याने वीरमरण येऊन मृत्यू झाला. काल शुक्रवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कासारवाडी येथे खांडेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
राज्य शासन खांडेकर कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहे. शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, पालकमंत्री भरणे यांनी त्यांना आश्वस्त केले.
विठ्ठल खांडेकर हे 2004 साली CRPF मध्ये भरती झाले होते. त्यांचे वय 40 वर्षे होते. सकाळी जम्मू येथे सराव सुरू असताना त्यांना चक्कर आल्याने लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. शवविच्छेदन केल्यानंतर विमानाने त्यांचे पार्थिव पुण्यात व तेथून कासारवाडी येथे येणार असल्याचे सरपंच जितेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. वडिलांना शेती नसल्याने ते मजुरी करून आपली उपजीविका भागवतात.